इस्त्रायल हमास युद्ध थांबणार? इस्त्रायलच्या ‘त्या’ प्रस्तावाची अमेरिकेने केली घोषणा

इस्त्रायल हमास युद्ध थांबणार? इस्त्रायलच्या ‘त्या’ प्रस्तावाची अमेरिकेने केली घोषणा

Israel Hamas War : गाझा पट्टीत सुरू असलेलं विनाशकारी युद्ध थांबवण्याची जबाबदारी आता हमासकडे आली आहे. कारण इस्त्रायलने युद्धविरामाचा प्रस्ताव दिल्याची घोषणा अमेरिकेने केली आहे. अमेरिकेने ही माहिती दिल्यानंतर आता मागील आठ महिन्यांपासून सुरू असलेलं युद्ध थांबण्याची शक्यता दिसू लागली आहे. इस्त्रायलने दिलेला हा नवा प्रस्ताव हमासने स्वीकारावा असा आग्रह अमिरेकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केला आहे. आता हे युद्ध संपवण्याची वेळ आली आहे, असेही बायडेन यावेळी म्हणाले.  इस्त्रायलने जो प्रस्ताव दिला आहे तो तीन भागात आहे.

प्रस्तावाच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात सहा आठवड्यांच्या युद्धविरामाने होईल. यानुसार इस्त्रायल डिफेंस फोर्स गाझातून माघार घेईल. याव्यतिरिक्त गाझातील आवश्यक मदत पाठवण्याची गती वाढविण्यात येईल. हमासच्या ताब्यातील इस्त्रायली नागरिकांच्या सुटकेच्या बदल्यात हमासच्या दहशतवाद्यांना सोडण्यासही इस्त्रायल तयार आहे. तसेच युद्धामुळे गाझात जो विध्वंस झाला आहे तो दूर करून गाझाचा विकास करण्यासाठी नवीन योजना सुरू करण्यात येतील असे या प्रस्तावात म्हटले आहे.

Israel Hamas War : इस्त्रायलपुढे मोठं आव्हान; राजधानी तेल अवीववर हमासचा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला

इस्त्रायलच्या या प्रस्तावावर हमासनेही प्रतिक्रिया दिली आहे. या प्रस्तावाकडे आम्ही सकारात्मक दृष्टीने पाहतो असे हमासने म्हटले आहे. शुक्रवारी व्हाईट हाऊस येथे बोलताना बायडेन म्हणाले, की प्रस्तावित योजनेच्या पहिल्या टप्प्यात पूर्ण आणि संपूर्ण यु्द्धविराम, लोकसंख्या असलेल्या भागातून इस्त्रायली सैन्याची वापसी आणि पॅलेस्टिनी कैद्यांसाठी ओलिसांचे आदानप्रदान या गोष्टींचा समावेश असेल.

बायडेन म्हणाले, हा एक निर्णायक क्षण आहे. हमासचं म्हणणं आहे की त्यांना युद्धविराम हवा आहे. हमाससाठी सिद्ध करण्याची संधी आहे की खरंच त्यांना युद्धविराम हवा आहे का. युद्धविराम झाला तर या युद्धग्रस्त भागात मदत मिळणे शक्य होणार आहे. या प्रस्तावांतर्गत प्रत्येक दिवशी सहाशे ट्रक मदत गाझात पाठवण्यात येणार आहे. युद्धविरामाच्या दुसऱ्या टप्प्यात हमासने अपहरण केलेले इस्त्रायली नागरिक आणि सैनिकांची वापसी यांचा समावेश आहे.

ब्रिटेनचे विदेश मंंत्री डेव्हिड कॅमेरून यांनीही हा प्रस्ताव हमासने स्वीकारावी अशी विनंती केली आहे. हा प्रस्ताव जर हमासने स्वीकारला युद्ध थांबल्याचं आम्हाला पाहता येईल. आम्ही युद्धविराम व्हावा यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहोत. यानंतर परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी जे शक्य असेल ते आम्ही करू असे डेव्हिड कॅमेरुन यांनी स्पष्ट केले.

दौरा पॅलेस्टाइनचा, हेलिकॉप्टर जॉर्डनचं अन् सुरक्षा इस्त्रायलच्या हाती; PM मोदींनी सांगितला खास किस्सा

प्रस्तावाच्या तिसऱ्या टप्प्यात म्हटले आहे की गाझा पट्टीत बंधक केलेल्या ज्या इस्त्रायली नागरिकांचा मृत्यू झाला त्या नागरिकांचे मृतदेह हमासने परत करावेत. गाझात जो विध्वंस झाला आहे. शाळा, महाविद्यालयांचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व गोष्टी पूर्ववत करण्यासाठी अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय समुदाय मोठे पॅकेज देईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube