सत्ताधाऱ्यांचा ‘True Caller’ आज निवृत्त झाला, रश्मी शुक्लांचा कार्यकाळ संपताच काँग्रेसचा खोचक टोला
या सगळ्या घटनाक्रमावरुन काँग्रेसने ट्वीट करत शुक्ला यांच्यावर टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांचा True Caller आज सेवानिवृत्त झाला अशी टीका केली.
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Politics) आज सेवानिवृत्त झाल्या आहेत. पोलीस दलात त्यांनी साडे 37 वर्ष काम केलं. रश्मी शुक्ला यांना मुंबईत भोईवाडा इथल्या पोलीस मैदानात मानवंदना देण्यात आली. त्यानंतर शुक्ला यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. त्यांच्या यशस्वी कारकिर्दीबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
या सगळ्या घटनाक्रमावरुन काँग्रेसने ट्वीट करत शुक्ला यांच्यावर टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांचा True Caller आज सेवानिवृत्त झाला, असं खोचक ट्वीट काँग्रेसकडून करण्यात आलं आहे. काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रश्मी शुक्ला यांचा फोटो शेअर करत टोला लगावला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंग प्रकरणात गंभीर आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, राज्यात सत्तापालट होताच दाखल झालेले गुन्हे रद्द करण्यात आले, त्यावरूनही मोठी टीका झाली होती.
मोठी बातमी! आयपीएस अधिकारी सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक
याशिवाय विधानसभा निवडणुकीच्या काळात विरोधीपक्षांनी रश्मी शुक्ला यांच्यावर पक्षपाताचे आरोप केल्यानंतर निवडणूक आयोगानं त्यांची बदली केली. पुढं भाजपा सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर त्यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी वर्णी लावण्यात आली. दरम्यान, सेवा निवृत्तीनंतर बोलताना रश्मी शुक्ला म्हणाल्या की, गेली दोन वर्ष आपल्याला महाराष्ट्र पोलिसांची सेवा करण्याची संधी मिळाली. या कार्यकाळात राज्यातील कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहिली. सगळे सणवार देखील व्यवस्थित पार पडले, याचा आपल्याला अभिमान आहे.
या कार्यकाळात झालेल्या निवडणुकाही शांततेत पार पडल्या. हे सारं यश केवळ एका व्यक्तीचं नाही, तर संपूर्ण पोलीस दलाचं आहे. या कार्यकाळात गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागांची स्थितीही सुधारली. तिथल्या नक्षलवाद्यांची संख्या देखील कमी होतेय, याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे,” असं यावेळी रश्मी शुक्ला यांनी सांगितलं.
नायगाव इथल्या सोहळ्यानंतर रश्मी शुक्ला यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील त्यांच्या ‘वर्षा’ या शासकिय निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रश्मी शुक्ला यांचं त्यांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी पोलीस कारकिर्दीबद्दल अभिनंदन केलं. महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात त्यांनी बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेचा मुख्यमंत्र्यांनी यावेळी गौरव केला
सदानंद दाते नवे पोलीस महासंचालक
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांच्या जागी राज्याचे नवनियुक्त पोलीस महासंचालक म्हणून सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज सदानंद दाते यांनी रश्मी शुक्ला यांच्याकडून आपल्या पदाचा कार्यभार हाती घेतला. तत्पूर्वी त्यांनीही मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन करत मुख्यमंत्र्यांनी त्यांना कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
सत्ताधाऱ्यांचा True Caller आज सेवानिवृत्त झाला..! pic.twitter.com/D6cPeZkUVl
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) January 3, 2026
