Akola Lok Sabha : तिरंगी लढतीत भाजपला लीडची आशा, मतविभाजनामुळे आंबेडकर खासदार होणार?

Akola Lok Sabha : तिरंगी लढतीत भाजपला लीडची आशा, मतविभाजनामुळे आंबेडकर खासदार होणार?

Akola Lok Sabha : अकोला लोकसभा (Akola Lok Sabha) मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीन (EVM machine) मध्ये 26 एप्रिल रोजी बंद झालं. तेव्हापासून मतदारसंघातील पारा-पारांवर, चौका-चौकात कोण विजयी होणार? याच्याच चर्चा सुरू आहेत. दरम्यान, यंदा अकोल्यात मतदानाचा टक्का वाढला आहे, हा वाढलेला टक्का मतदारसंघात परिवर्तन करणार का? तिरंगी लढतीत कोण विजयाचा गुलाल उधळणार? हे चार जूनलाच स्पष्ट होणार आहे.

‘बाहुबली’चा कट्प्पा साकारणार मोदींची भूमिका? पंतप्रधानांचा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 

कॉंग्रेसचा बालेकिल्ला भाजपच्या ताब्यात
1984 पर्यंत अकोला हा काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला होता. नंतर काँग्रेसमधील दुफळीमुळे हा मतदारसंघ भाजपने हिसकावला. पहिल्यांदा हा मतदारसंघ कॉंग्रेसच्या ताब्यातून खेचून आणला तो भाजपचे दिवंगत नेते पांडुरंग फुंडकर यांनी. फुंडकर हे सलग तीन वेळा याठिकाणाहून खासदार राहिले. पण 1998 आणि त्यानंतर लगेचच 1999 मध्ये झालेल्या निवडणुकीत अकोलेकरांनी प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar) कौल दिला आणि त्यांनी दिल्लीत अकोल्याचे प्रतिनिधित्व केले.

तिहेरी लढत भापजच्या पथ्यावरच
प्रकाश आंबेडकर 1984 पासून सातत्याने लढत असल्याने मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. अपवाद फक्त 1998 आणि 1999 च्या निवडणुका होत्या. कारण त्यावेळी आंबेडकरांना कॉंग्रेसने पाठिंबा दिला होता. त्यानंतर झालेल्या प्रत्येक तिहेरी लढत ही भापजच्या पथ्यावरच पडल्याचा इतिहास आहे. 2014 आणि 2019 मध्ये काँग्रेसने अल्पसंख्याक उमेदवार उभे केल्यामुळे निवडणुकीला धार्मिक रंग देण्यात आला होता. तरीही भाजपने आपले एकतर्फी वर्चस्व कायम ठेवले होते.

Sangli Loksabha : पैलवान, काका, अन् विशाल पाटील..; सांगलीचा आखाडा कोण मारणार? 

धोत्रेंवर पराभवाचं सावट
दरम्यान, आता मतदारंसघात राजकीय समीकरणे बदलली. भाजपने संजय धोत्रेंच्या जागी त्यांचे पुत्र अनूप धोत्रेंना संधी दिली होती. अनुप धोत्रेंनी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली. पक्ष संघटनेतील त्यांची पकड, कार्यकर्त्यांचे नेटवर्क आणि मोदींचा चेहरा आणि संजय धोत्रेंनी अनेक वर्ष केलेलं संघटनात्मक काम ही त्यांची जमेची बाजू होती. मात्र, मतदारसंघात भाजप विषयी नाराजीचा सुर होता. त्यामुळं अनुप धोत्रेंवर पराभवाचं सावट असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात.

मराठा मतदार गेम चेंजर ठरणार
काँग्रेसने डॉ. अभय पाटील यांच्या रुपाने मराठा उमेदवार देऊन अनुप धोत्रेंना शह देण्याचा प्रयत्न केला. या मतदारसंघावर मराठा मतदारांचे वर्चस्व आहे. अनुप धोत्रे आणि अभय पाटी हे दोन्ही उमेदवार याच समाजातून येतात. तर ॲड. प्रकाश आंबेडकरही हे मराठा समाजाच्या व्होटबँकेवर लक्ष ठेऊन होते. मधल्या काळात त्यांनीही मराठा समाजाला आपलेसे करण्याचे प्रयत्न केला. त्यामुळं अकोल्यात मोठ्या प्रमाणात मतांचे प्रचंड विभाजन होणं अटळ आहे. या समाजाने धोत्रे, पाटील की आंबडेकर यांना मतदान केले, याचा अंदाज या उमेदवारांनाही बांधणे कठीण असून मराठा समाजाच्या मतांवर विजयाचे गणित अवलंबून असल्‍याचे बोलले जात आहे.

ओबीसी, मुस्लिम, माळी मतदारांची भूमिका निर्णायक
अकोल्यात ‘कास्ट फॅक्टर’ फार महत्वाचा आहे. डॉ. अभय पाटील, अनुप धोत्रे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या पारड्यात आपल्या समाजाची मते कशी पडतील, त्यावरही गणित अवलंबून आहे. शिवाय, मतदारसंघात ओबीसी, मुस्लिम, दलित, माळी, धनगर, आदिवासी, बंजारा आदी मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. या समाजांची गठ्ठा मते कुणाकडे वाळतात, यावर विजयाचे गणित अवलंबून आहे.

सेनेच्या दोन्ही गटाची ताकद निर्णायक ठरणार
यंदाच्या निवडणुकीत शिवसेना दोन गटांत विभागली गेली आहे. या मतदारसंघात भाजपचीही ताकद आहेच. परंतु, शिवसेनेच्या दोन गटांची ताकद खरी निर्णायक ठरणार आहे. या निवडणुकीत शिंदे गटाने मित्रपक्ष भाजपला तर ठाकरे गटाने कॉंग्रेसला जी काही मदत केली, त्यावरही बरंच काही अवलंबून आहे. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी पाटील यांच्यासाठी चांगलाच जोर लावला होता. तर रिसोड विधानसभेचे कॉंग्रेसचे आमदार अमित झनक यांनीही पाटील यांच्यासाठी चांगलीच ताकद लावली होती. त्यामुळं पाटील यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

यंदा मतविभाजनाचा फायदा वंचितला होणार
गेल्या तीन-चार लोकसभा निवडणुकीची आकडेवारी पाहिली तर प्रत्येक वेळी आंबेडकर आणि काँग्रेस यांना एकत्रितपणे मिळणारी मते ही भाजपच्या संजय धोत्रेंना मिळालेल्या मतांच्या जवळपास किंवा जास्तही राहिल्याचं दिसंत. मात्र, आता मराठा आणि कुणबी समाजाचं मतविभाजन हे धोत्रे आणि पाटील यांच्यात  होऊ शकते आणि त्याचा फायदा वंचितला आघाडी मिळू शकतो.

मतदानाचा वाढलेला टक्का परिवर्तन घडणार?
अकोला लोकसभा मतदारसंघात यंदा मतदानाचा टक्का दोन टक्क्यांनी वाढलाय. 2019 मध्ये अकोल्यात 59. 76 टक्के मतदान झालं होतं. तर यंदा मतदानाचा टक्का हा 61.79 टक्क्यांवर गेला आहे. दरम्यान, या वाढलेल्या मतदानाचा फायदा हा आपल्यालाच होणार असल्याचा दावा कॉंग्रेसने केला आहे. दरम्यान, ही वाढलेली मते सत्ताधारी भाजपच्या उमेदवाराला मताधिक्य मिळवून देणारी की परिवर्तन घडविणारी ठरणार, हे चार जुनलाच स्पष्ट होईल.

दरम्यान, मतदानाची टक्केवारी वाढल्यामुळे तिरंगी लढतीत प्रत्येक उमेदवार आपल्यालाच सर्वाधिक मताधिक्य मिळेल, असा दावा करत आहेत. मात्र, कोणी कितीही दावे केले असेल तरी मतदार कोणाच्या पाठीशी आहेत. हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube