Letsupp Special : धंगेकर रिटर्न्सची म्हणूनच भाजपला भीती आहे….
Ravindra Dhagekar Vs Murlidhar Mohol : पुणे लोकसभा मतदारसंघासाठीची अपेक्षित लढत आता प्रत्यक्षात आली आहे. भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आणि काॅंग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhagekar) यांच्यातील सामना लक्षवेधी ठरणार आहे. कसबा पोटनिवडणुकीच्या पाठोपाठ धंगेकर हे लोकसभा निवडणुकीसाठी परतले आहेत. भाजपला त्यांच्याच बालेकिल्ल्यात मात देणारा नेता म्हणून धंगेकर यांनी आपली ओळख प्रस्थापित केली. त्यामुळेच धंगेकर लोकसभा निवडणुकीत चमत्कार घडवतील, याच आशेने काॅंग्रेसने त्यांना उमेदवारी दिली असून, त्याच विश्वासाने ते रिंगणात उतरले आहेत.
एक अकेला धनंजय चंद्रचूड क्या करेगा?
पुण्यात काॅंग्रेसची ताकद 2014 पूर्वी इतकी होती की, या पक्षाचा उमेदवार पराभूत करणे कठीण काम होते. आता तसेच भाजपबाबत झाले आहे. भाजपला मत देणाऱ्यांची संख्या गेल्या दोन्ही निवडणुकांत सुमारे सहा लाखांपेक्षा अधिक आहे. त्या तुलनेत काॅंग्रेसला त्याच्या निम्मी म्हणजे फक्त तीन लाख इतकीच मते मिळाली आहेत. म्हणूनच धंगेकर यांना तब्बल तीन लाखांचा फरक भरून काढायचा आहे. हे सोपे काम नाही. पाहू या पुण्यातील नक्की गणिते काय आहेत?
कोथरूडमध्ये भाजपसाठी ‘फिल गुड’
पुणे लोकसभा मतदारसंघात कोथरूड, शिवाजीनगर, कसबा, पर्वती, पुणे कॅन्टोंन्मेंट आणि वडगाव शेरी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. मुरलीधर मोहोळ हे कोथरूड मतदारसंघाचे तर, धंगेकर हे कसब्याचे प्रतिनिधित्व करतात. यातील कोथरूड, शिवाजीनगर आणि पर्वती हे सरळसरळ भाजप समर्थक मतदारसंघ आधीपासून आहेत. या तीनही मतदारसंघांत भाजपला आपले केवळ मताधिक्य किती, याचेच औत्सुक्य असते. यात कोथरूड तर म्हणजे हक्काचा मतदारसंघ. 2014 आणि 2019 या दोन्ही लोकसभा निवडणुकांत भाजपला या मतदारसंघातून सुमारे एक लाखाचे मताधिक्य मिळाले होते. मोहोळ यांना आता येथून एक लाखांहून अधिक मताधिक्य मिळण्याची आशा आहे. या मतदारसंघात ब्राह्मण मतदार मोठ्या संख्येने आहेत. तेथील माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना पक्षाने नुकतचे राज्यसभेचे खासदार केले आहे. उच्चशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे येथील आमदार आहेत. त्यात स्वतः मोहोळ हे याच मतदारसंघातील असल्याने येथून जास्तीत जास्त मतदान करून घेणे आणि मोठी आघाडी मिळविणे हेच भाजपचे ध्येय आहे. मोहोळ यांच्या एकूण मताधिक्याच्या एक तृतीयांश आघाडी कोथरूडमधूनच मिळू शकते. परिणामी मोहोळांसाठी हा मतदारसंघ फिल गुड करणारा आहे.
LetsUpp Special : शरद पवारांना फक्त सहा जागा; नाना पटोले, थोरात आगीशी खेळतायेत?
पर्वती भाजपचा दुसरा आधार
पर्वती विधानसभा मतदारसंघ हा भाजपसाठी दुसरा आधार आहे. या मतदारसंघातून गेल्या दोन निवडणुकांत भाजपला सुमारे 60 हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. येथून भाजपचा आमदार सातत्याने निवडून येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत मताधिक्य निम्म्यावर येत असले तरी, हा मतदारसंघही भाजपसाठी अनुकूलच मानला जातो. त्यामुळे मोहोळ यांची मोठी मदार या मतदारसंघावर आहे. काॅंग्रेसमध्ये याउलट येथे धुसफूस आहे. काॅंग्रेसचे येथील नेते आबा बागूल यांनी धंगेकर यांच्या उमेदवारीच्या विरोधात उघडपणे भूमिका घेतली आहे. त्याचाही फटका धंगेकर यांना बसू शकतो. त्यामुळे धंगेकर यांना कोथरूड आणि पर्वती हे दोन्ही मतदारसंघ कठिणच राहणार आहेत.
शिवाजीनगरमध्ये काय होणार?
शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघात शिरकाव करण्याची संधी धंगेकर यांना मिळू शकते. या ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे हे फक्त पाच हजाराच्या मताधिक्याने निवडून आले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांना 25 हजाराचे मताधिक्य येथून मिळाले होते. तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे अनिल शिरोळे यांना 40 हजार मतांची आघाडी होती. या मतदारसंघात काॅंग्रेसला मानणारा वर्गही मोठ्या प्रमाणात आहे. तो धंगेकर आपल्याकडे वळवू शकतात. या मतदारसंघात भाजपला रोखण्याची संधी धंगेकर यांना आहे. ती त्यांनी साधली तर, मोहोळ यांच्यासाठी तो धक्का ठरेल. पण त्यासाठी तेथील काॅंग्रेसची यंत्रणा त्यांना आक्रमकपणे राबवावी लागेल.
कसबा हे तर धंगेकरांचे घरच
कसब्यातून मोठे लीड मिळविण्याचे धंगेकर यांचे स्वप्न आहे. त्यांच्या संभाव्य विजयाची पायाभरणी कसब्यातूनच होऊ शकते. पण येथे भाजपची संघटनात्मक आणि मतदारांची ताकद हे काॅंग्रेसपेक्षा जास्त आहे. धंगेकरांना केवळ स्वतःच्या बळावर येथून मताधिक्य मिळविणे एवढे सोपे नाही. कसबा पोटनिवडणुकीत धंगेकर यांच्याकडून गेल्या वर्षी झालेला पराभव भाजपला झोंबलेला आहे. त्यामुळे धंगेकर यांना वाटते तेवढी लढत येथून सोपी नाही. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत भाजपने येथून चांगली आघाडी घेतली होती. गिरीश बापट हेच कसब्याचे 25 वर्षे आमदार होते. त्यामुळे त्यांना गेल्या लोकसभा निवडणुकीत कसब्याने मनापासून साथ दिली. तशीच साथ 2014 मध्ये भाजपच्या अनिल शिरोळे यांनाही दिली होती. येथून भाजपला तब्बल 60 हजारांचे मताधिक्य भाजपला मिळाले होते. ते तोडण्याचे काम धंगेकरांना करायचे आहे. खुद्द धंगेकर हे 13 हजार मतांच्या फरकाने निवडून आले होते. धंगेकर यांना 50 हजारांहून अधिक मताधिक्य येथून मिळाले तरच त्यांच्या उमेदवारीचा निर्णय योग्य होता, हे सिद्ध होईल.
वडगाव शेरी काॅंग्रेससाठी सोपी नाही…
वडगाव शेरी हा पुण्यातील सर्वाधिक मतदारसंख्या असलेला मतदारसंघ आहे. गेल्या दोन्ही निवडणुकांत या मतदारसंघाने भाजपला भरभक्कम साथ दिली आहे. भाजपचे खासदार गिरीश बापट यांना तब्बल 60 हजार आणि अनिल शिरोळे यांना 45 हजारांचे मताधिक्य येथून मिळाले होते. या मतदारसंघात राष्ट्रवादी काॅंग्रेसची मोठी ताकद आहे. अजित पवार यांच्याच गटाचा येथे वरचष्मा आहे. ही ताकद आता भाजपच्या सोबतीला आहे. त्यामुळे मोहोळ यांच्यासाठी येथून तब्बल 75 हजारांची आघाडी मिळवून देण्याचा संकल्प भाजपने केला आहे. काॅंग्रेसची ताकद या मतदारसंघात कमी आहे. पण महाआघाडीत असलेल्या शिवसेनेची मदत येथे धंगेकर यांना होऊ शकते. तेवढाच दिलासा धंगेकर यांना आहे. यामुळे भाजपला येथे रोखण्यासाठी धंगेकर यांना कष्ट करावे लागणा आहेत. शरद पवार यांना मानणारा वर्ग मतदानासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडला तर, धंगेकर यांच्यासाठी ती मोठी मदत ठरेल.
पवारांनी भाकरी फिरवली; धनुभाऊंचा खास माणूसच पंकजांचा पेपर अवघड करणार!
पुणे कॅन्टोंन्मेंट हा धंगेकरांसाठी खरा आधार
अठरापगड जाती, सर्वधर्मीय वस्ती असलेला पुणे कॅन्टोन्मेंट हा धंगेकरांसाठी खरा आधार ठरू शकतो. काॅंग्रेसला मानणाऱ्या मतदारांची संख्या येथे जास्त आहे. त्यासाठी स्थानिक काॅंग्रेस नेत्यांशी धंगेकर यांना जुळवून घ्यावे लागणार आहे. येथून भाजपला 2019 च्या लोकसभा निवडणुकीत फक्त 13 हजारांची आघाडी मिळाली होती. येथील भाजपचे आमदारही फक्त पाच हजारांच्या मताधिक्याने निवडून आले होते. त्यामुळे धंगेकर यांना या मतदारसंघाने मनापासून साथ दिली तर, ते मोहोळ यांच्यासाठी कडवे आव्हान उभे करू शकतात. कोथरूड आणि पर्वती या दोन विधानसभा मतदारसंघातून तब्बल दीड ते पावणे दोन लाखांचे मताधिक्य भाजपला मिळू शकते. काॅंग्रेसला त्याची भरपाई करण्याची चावी ही पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये आहे.
शिवाजीनगरमध्ये भाजपला समसमान पातळीवर रोखणे, कसबा आणि पुणे कॅन्टोन्मेंट येथून मिळून सुमारे एक लाखांचे मताधिक्य घेणे या दोन बाबी धंगेकरांनी साध्य केल्या तर, ही निवडणूक चुरशीची होईल. वडगाव शेरीत भाजपला टक्कर देण्यात ते यशस्वी झाले तर, धक्कादायक निकालही लागू शकतो. म्हणूनच धंगेकर रिटर्न्स हा राजकारणातील सिक्वेल तुफान यशस्वी होण्याची शक्यता म्हणूनच नाकारता येत नाही.