अजितदादांंची पॉवर! सरकारमध्ये येताच आमदारांना मोठं गिफ्ट; नियोजनही झालं

अजितदादांंची पॉवर! सरकारमध्ये येताच आमदारांना मोठं गिफ्ट; नियोजनही झालं

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा एक मोठा गट अजित पवार यांच्या नेतृत्वात शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सरकारमधील राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना अद्याप खाते मिळालेले नाहीत. मात्र, सरकारने वेगळे नियोजन सुरू केले असून अजितदादांसोबत आलेल्या आमदारांच्या मतदारसंघात विकासकामांसाठी प्रत्येकी शंभर कोटींचा निधी देण्याचे ठरले आहे.

या बाबत हालचाली सुरू झाल्या असून याच अधिवेशनात हा निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासाठी आमदारांना प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

.. तेव्हा भाजपसोबत काय घडलं? पवारांची साथ सोडताच भुजबळांनी सगळंच सांगितलं

अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना एक तर मंत्रिपद मिळणार किंवा निधी अशी काही तरी भेट मिळणार अशी चर्चा होती. पहिल्या टप्प्यात अजित पवार यांच्यासह 9 आमदारांनी शपथ घेतली. त्यांना कोणती खाती दिली जाणार हे अद्याप निश्चित नाही. दुसरीकडे शिंदे गटालाही अजून खातेवाटप झालेले नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. अशा परिस्थितीत विस्तार झाला तर नाराजी निश्चित होणार आहे. हे संभाव्य संकट टाळण्यासाठी वेगळे प्लॅनिंग केल्याचे दिसत आहे.

अजित पवार यांच्यासोबत आलेल्या आमदारांना प्रत्येकी 100 कोटी रुपये निधी देण्याचे नियोजन आहे. येत्या पावसाळी अधिवेशनातच हा विषय मार्गी लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या आहेत. यानंतर आता आमदारांनी कामाला सुरुवात केली आहे. कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन कोणती कामे करायची, याचे नियोजन सुरू आहे. यासाठी प्रस्ताव तयार करून सादर केले जाणार आहेत.

NCP Crisis : शरद पवारांची साथ का सोडली? दिलीप वळसे-पाटलांनी सांगितलं कारण…

शिंदे गटाचे आमदार उपाशी

दरम्यान, शिवसेनेत बंडखोरी करत भाजप बरोबर सरकार स्थापन करून एक वर्ष उलटून गेले आहे.  तरी देखील शिंदे गटातील अनेक आमदारांना मंत्रीपदे मिळालेली नाहीत.  मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असतानाच अजित पवारांसह काही आमदारांनी सरकारमध्ये एन्ट्री घेतली. त्यामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसला. आता आमदारांना मंत्रीपदे मिळतील की नाही याची काहीच शाश्वती राहिलेली नाही. एक वर्षानंतरही बहुतांश आमदारांची पदरी निराशा कायम आहे. दुसरीकडे अजित पवार गटाची मात्र लॉटरीच लागली आहे.

शिवसेनेत फूट पडली तेव्हा खोक्यांची मोठी चर्चा झाली होती. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांना गद्दार म्हणून डिवचले गेले. आजही राज्याच्या राजकारणात खोके आणि गद्दार या दोन शब्दांनी शिंदेंच्या आमदारांचा पिछा सोडलेला नाही. मात्र, अजित पवार यांच्यासोबत आलेल्या आमदारांबाबत मात्र असे अजून तरी घडलेले नाही. त्यांच्याबाबतीत असे शब्द कुठेच ऐकू येत नाहीत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube