“भाजपच्या कोणत्या नेत्याला तुरुंगात टाकायचं हे ठरलं होतं”, दानवेंनी केला ‘मविआ’चा प्लॅन उघड
Jalna News : राज्यात महायुतीचं सरकार स्थानापन्न झालं आहे. उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यातच आता विरोधक आणि सत्ताधारी पक्षांत जोरदार वाक् युद्ध सुरू झालं आहे. भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीचं सरकार जर आलं असतं तर त्यांचा नेमका काय प्लॅन होता याचा खुलासा दानवे यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. भाजपाच्या कोणत्या नेत्याला जेलमध्ये टाकायचं हे महाविकास आघाडीने ठरवलं होतं असे दानवे म्हणाले आहेत.
दानवे पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांतील उमेदवार मोठ्या संख्येने विजयी झाले होते. यानंतर महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीत आमचे 200 आमदार निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत असे वातावरण तयार केले होते. मंत्री कुणाला करायचं, कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं द्यायचं हे देखील त्यांचं ठरलं होतं. इतकंच नाही तर भाजपाच्या कोणत्या नेत्याला तुरुंगात टाकायचं हे देखील त्यांनी ठरवलं होतं, असा गौप्यस्फोट दानवे यांनी केला.
निवडणुकीत पराभव झाल्याने महाविकास आघाडीला आता या गोष्टी शक्य झाल्या नाहीत. पराभवाचे कारण शोधता येत नसल्याने आता त्यांच्याकडून ईव्हीएमला दोष देण्याचा प्रयत्न केला जात आहे. राजकारणात एकतक कन्फ्यूज करावं लागतं किंवा कन्व्हेन्स तरी करावं लागतं. पण राज्यातील जनतेला महाविकास आघाडीवाले कन्व्हेन्स करू शकले नाही. त्यामुळेच कन्फ्यूज करण्याचे काम सुरू आहे अशी टीका दानवे यांनी केली.
ठरलं तर! उद्या होणार मंत्रिमंडळाचा विस्तार; CM फडणवीस स्वतः भावी मंत्र्यांना करणार फोन
भारतीय जनता पक्षाने अनेक निवडणुका पाहिल्या आहेत. अनेक निवडणुकांत पराभवही झाला आहे. मात्र आम्ही कधी ईव्हीएमवर शंका उपस्थित केल्या नाहीत. लोकसभा निवडणुकीतही आमचा काही ठिकाणी पराभव झाला. कर्नाटकमध्ये आमचा पराभव झाला. हरियाणातही लोकसभा निवडणुकीत कमी जागा मिळाल्या. तरी देखील आम्ही कधीच ईव्हीएमवर आरोप केले नाहीत असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.