उन्मेष पाटलांचा पक्षप्रवेश… भाजप अन् शिंदेंना धक्का देत ठाकरेंनी सेट केलं जळगावचं गणित
रायगड, ठाणे, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यानंतर उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) सगळ्यात मोठा फटका कुठे बसला तर तो खान्देशात. त्यातही जळगाव जिल्ह्यात. गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील, किशोर आप्पा पाटील, चंद्रकांत पाटील, लता सोनावणे अशा एका-दोघांनी नाही तब्बल पाच आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली. सर्व जण शिंदेंच्या सेनेत जाऊन स्थिरावले. मागच्या दोन वर्षांच्या काळात ठाकरेंनी शक्य असेल तिथे पर्यायी नेतृत्व तयार केले किंवा आयात केले. त्यांना ताकद दिली. साथ सोडून गेलेल्यांचा बंदोबस्त केला. जळगाव जिल्ह्यात मात्र ठाकरेंनी फारशी हालचाल केली नव्हती.
अशात खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil ) आणि पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार (Karan Pawar) यांनी भाजपला (BJP) धक्का देत ठाकरेंच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला आहे. त्यांच्या येण्याने जळगाव जिल्ह्यात संघटनेत दहा हत्तींच बळ संचारलं आहे. गटाला नवीन उभारी मिळाल्याचे दिसत आहे. ठाकरेंनी करण पवार यांना लोकसभेची उमेदवारीही जाहीर केली आहे. तर पाटील यांना ठाकरेंनी जळगावमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेतृत्व करायला सांगितले असल्याचे बोलले जाते. यातून ठाकरेंनी एकाच फटक्यात जिल्ह्यातील अनेक समीकरणे साधली असल्याचे दिसून येते. (Unmesh Patil and Parola Mayor Karan Pawar have joined Thackeray’s Shiv Sena)
याच पार्श्वभूमीवर पाहुयात नेमके काय घडत आहे जळगाव जिल्ह्यात…
पाटील यांच्या येण्याने ठाकरेंना झालेला पहिला फायदा म्हणजे जळगावची जागा आणि सक्षम उमेदवार :
जळगावमध्ये शिवसेनेचे मोठी ताकद आहे. 2014 साली तीन आणि 2019 मध्ये पाच आमदार निवडून आले होते. याशिवाय महापालिका आणि जिल्हा परिषदेतही शिवसेनेचे दोन आकडी सदस्य निवडून येत असतात. त्यामुळे जिल्ह्यातील दोनपैकी एक तरी लोकसभा मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी ठाकरे अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होते. पण भाजपने दोन्ही मतदारसंघावर आपली मांड पक्की केली होती. त्यामुळे ठाकरेंना नजर वर करता येत नव्हती.
मोठी बातमी! नवनीत राणांना दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून जात प्रमाणपत्र वैध
आता महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंनी काँग्रेसकडून जळगावचा मतदारसंघ मिळवला आहे. पण त्यांच्याकडे सक्षम उमेदवार नव्हता. अशात भाजपने पाटलांचे तिकीट कापले अन् ठाकरेंना चान्स दिसला. आता ठाकरेंकडे मतदारसंघ आहे, करण पवार यांच्यारुपाने उमेदवार आहे. संघटनेची आणि जोडीला काँग्रेस-शरद पवारांची ताकदही आहे. त्यात उन्मेष पाटील खंबीरपणे पवार यांच्या पाठीशी उभे राहिले तर जळगावचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो असे ठाकरेंचे मत आहे.
भाजपमधील नाराजांची मोट बांधून स्मिता वाघ यांचा पराभव :
मागच्या लोकसभेवेळी ऐनवेळी तिकीट मिळूनही उन्मेष पाटील तब्बल साडे चार लाख मतांनी निवडून आले होते. त्यामुळे यंदाही त्यांनाच तिकीट मिळणार असल्याचे सांगितले जात होते. पण यंदा भाजपने विविध कारणांचा आणि सर्वेक्षण अहवालांचा हवाला देत पाटलांचे तिकीट कापले. गतवेळी संधी हिरावून घेतलेल्या स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. भाजपमधील या घडामोडींचा जिल्ह्यातील संघटनेत नकारात्मक मेसेज गेल्याचे दिसून येत आहे.
मंत्री गिरीश महाजन आणि चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यामुळे पाटलांचे तिकीट कापले अशी भावना त्यांच्या समर्थकांमध्ये पसरली. आता पाटील यांचे बरेच समर्थक पदाधिकारी भाजपमध्ये नाराज आहेत. हीच नाराजी हेरत ठाकरेंनी पाटील यांना पक्षप्रवेशाचे आमंत्रण दिले. आता पाटील यांच्यासोबत फक्त करण पवार यांनीच प्रवेश केला आहे. पण पुढील काळात त्यांचे समर्थक, पदाधिकारी, कार्यकर्ते ठाकरेंकडे येऊ शकतात.या सर्व नाराजींची मोट बांधून आणि महाविकास आघाडीच्या ताकदीच्या जोरावर पाटील स्मिता वाघ यांचा पराभव करु शकतील असा ठाकरेंचा होरा आहे.
गुलाबराव पाटलांच्या जागी ठाकरेंना मिळाला चेहरा :
पाटील यांच्या येण्याने ठाकरेंना झालेला तिसरा फायदा म्हणजे पक्षाच्या पुनर्बांधणीला मिळालेला नवीन चेहरा. जळगाव जिल्ह्यात 2019 मध्ये अकरापैकी शिवसेनेचे तब्बल पाच आमदार निवडून आले होते. सध्या हे पाचही आमदार शिंदेंसोबत आहेत. त्यामुळे ठाकरेंना पक्षाची नव्याने बांधणी करायची आहे. रायगड, ठाणे, छत्रपती संभाजीनगर अशा जिल्ह्यांमध्ये ठाकरेंनी शक्य असले तिथे पर्यायी नेतृत्व दिले आहे. जळगावमध्ये मात्र जिल्ह्यात होल्ड असलेला असा चर्चेतील चेहरा त्यांच्याकडे नव्हता. आता ती कसर उन्मेष पाटील यांच्यारुपाने भरुन निघू शकते. आणखी एक गोष्ट म्हणजे आतापर्यंत सुरेश जैन, गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे एकहाती नेतृत्व करत होते. आता सुरेश जैन राजकीय व्यासपीठापासून लांब असतात, तर गुलाबराव पाटील शिंदेंसोबत गेले आहेत. त्यामुळे ठाकरेंना पाटील यांच्यारुपाने एकहाती नेतृत्व करु शकणारा चेहराही मिळाल्याचे दिसत आहे.
श्रीकांत शिंदे बच्चा तर नाच्यांवर बोलणार नाही, म्हणत राऊतांची शिंदे-फडणवीसांवर सडकून टीका
चाळीसगाव तालुक्यात करता येणार शिरकाव :
जळगाव जिल्ह्यात शिवसेनेला जामनेर, रावेर, अंमळनेर, चाळीसगाव या ठिकाणी आतापर्यंत शिरता आले नव्हते. चाळीगावमध्ये शिवसेनेची संघटनात्मक ताकदही नव्हती. उन्मेष पाटील हे यापूर्वी चाळीगावचे आमदार होते. आता ते ठाकरेंकडे आल्याने चाळीगावचे विधानसभा मतदारसंघाचे राजकारण ठाकरेंना पाटील यांच्या माध्यमातून आपल्या छत्राखाली आणता येईल. चाळीगावमध्ये सध्या भाजपचे मंगेश चव्हाण आमदार आहेत. त्यांच्याविरोधात ठाकरेंकडे पाटील यांच्यारुपाने सक्षम पर्याय मिळाल्याचे दिसून येते.
हे झाले ठाकरेंना होणारे फायदे.. पण पाटील यांना काय साधता येऊ शकते? हे बघणेही गरजेचे आहे.
पाटील यांनी विद्यमान खासदार असूनही स्वतः उमेदवारी न घेता करण पवार यांना पुढे केले आहे. पवार हे पाटील यांचेच निकवर्तीय समजले जातात. तर पाटील यांनी चाळीसगाव विधानसभचे तिकीट मिळविल्याची चर्चा आहे. याशिवाय सत्ता आल्यास स्वतःसाठी मंत्रिपदाची आणि जळगाव जिल्ह्यातील पालकमंत्रीपदची कमिटमेंट घेतली असल्याचेही बोलले जाते. आतापर्यंत गुलाबराव पाटील जळगावचे पालकमंत्री होते. पण पाटील यांनी त्यासाठी आतापासूनच फिल्डिंग लावल्याचे बोलले जाते.
याशिवाय लोकसभेची उमेदवारी मिळालेले करण पवार हे पारोळ्याचे नगराध्यक्ष आहेत. त्यांचे आजोबा 20 वर्षे आमदार होते. काका पाच वर्ष आमदार होते. त्यामुळे पवार कुटुंबियांची पारोळ्यावर चांगली पकड आहे. पवार हे लोकसभेला जरी पराभूत झाले तरी शिंदेसोबत गेलेले तिथले आमदार चिमणराव पाटील यांच्याविरोधात ठाकरेंकडे पवार यांच्यारुपाने एक सक्षम पर्याय मिळाला आहे. तिथे विधानसभेला पवार यांना पुन्हा संधी मिळू शकते. एकूणच काय उन्मेष पाटील यांच्या ठाकरे गटात येण्याने जसा ठाकरेंना फायदा होणार आहेत, तसाच फायदा पाटीलही करुन घेताना दिसणार आहेत.