मिंधेंनी बाळंत होत सहा गद्दारांना जन्म दिला; संजय राऊतांची शिंदे अन् फुटलेल्या खासदारांवर जहरी टीका

ठाकरेंच्या शिवसेनेच्या सहा खासदारांनी त्यांना जय महाराष्ट्र करत शिंदे गटाची वाट धरली आहे. ते आता शिंदेसेनेत प्रवेश करत आहेत.

News Photo   2026 06 22T160649.443

शिवसेना ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी (Sanjay Raut) त्यांची साथ सोडून शिंदेंच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सातत्याने त्यांच्यावर टीका करत आहेत. आताही त्यांनी अशाच प्रकारची जहरी टीका केल्याचं दिसतंय. मिंधे बाळंत झाले असून त्यांनी सहा गद्दारांना जन्म दिलाय, अशा शब्दात संजय राऊतांनी समाचार घेतला. पुढे जाऊन त्यांचे सिजरिंग करावं लागेल, अशा शब्दातही राऊतांनी तोंडसूख घेतलं.

ठाकरेंच्या शिवसेनेच्या सहा खासदारांनी त्यांना जय महाराष्ट्र करत शिंदे गटाची वाट धरली आहे. त्यामध्ये संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील, नागेश पाटील आष्टीकर आणि ओमराजे निंबाळकरांचा त्यामध्ये समावेश आहे. ही गोष्ट ठाकरेंच्या शिवसेनेला चांगलीच जिव्हारी लागल्याचं दिसतंय.

म्हणून ओमराजेंनी घेतला शिंदे गटात जाण्याचा निर्णय; तानाजी सावंतांनी सांगितलं कारण

शिंदेंसोबत गेलेले सहा खासदार मुंबईत परतले असून त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यावर खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. संजय राऊत म्हणाले की, मिंधे बाळंत झाले आहेत, त्यांनी सहा गद्दारांना जन्म दिलाय. ऑपरेशन सक्सेस झालं आहे. त्यांची बॉडी सुस्थितीत आहे असं नाही, पुढे त्यांना सिजरिंग करावं लागेल.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, हा एक विक्रम आहे. केनियामध्ये एका महिलेला पाच मुलं झाली होती. इथे सहा गद्दार जन्माला आले आहेत. संजय राऊतांच्या या टीकेवर आता शिंदेंच्या शिवसेनेतून काय प्रत्युत्तर दिलं जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, सहा बंडखोर खासदार मुंबईत परतले असून त्यांनी एकनाथ शिंदे यांची नंदनवन या निवासस्थानी भेट घेतली. हे सर्व खासदार आणि एकनाथ शिंदे आता त्यांची भूमिका मांडणार आहेत.

बंड केलेल्या या सहा खासदारांनी एक स्वतंत्र गट निर्माण केला असून तसे पत्र त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिलं आहे. त्या संबंधीत फोटो आणि लोकसभा अध्यक्षांना दिलेलं पत्र आता समोर येण्याची शक्यता आहे. हे सहाही खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत लवकरच प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

follow us