अजितदादांचा आता विदर्भावर डोळा? नागपूर-अमरावतीसाठी घेतला ‘स्पेशल’ निर्णय
नागपूर : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे नागपूरमधील रविभवन येथील शासकीय बंगल्यातील नवीन कार्यायल सुरु झाले आहे. सोबतच या कार्यालयात त्यांनी उपजिल्हाधिकारी संवर्गातील एका अधिकाऱ्याची ‘उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी’ (OSD) म्हणून नियुक्ती केली आहे. नागपूर-अमरावती विभागातील नागरिकांचे अर्थ खात्याशी निगडीत प्रश्न, समस्या, अडीअडचणी सोडविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या निर्णयाच्या आडून अजितदादांनी आता पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भावरही लक्ष केंद्रीत केले आहे का? असा सवाल सध्या विचारला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विदर्भात ताकद मर्यादित आहे. पक्ष स्थापनेनंतर विदर्भात राष्ट्रवादीला केवळ एक लोकसभेची दोनदा जागा जिंकता आली आहे. विदर्भातून नागपूर, चंद्रपूर-यवतमाळ, हिंगोली-वाशिम, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, रामटेक, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा या लोकसभेच्या 10 जागा येतात. मात्र पक्ष स्थापनेनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला विदर्भात फक्त भंडाऱ्याची जागा 2009 आणि 2018 ची पोटनिवडणूक अशी दोनदा जिंकता आली आहे. या दोन्हीवेळी काँग्रेससोबत युती होती.
आठवले, जानकर, बच्चू कडू आणि सदाभाऊ यांची अवस्था कढिपत्त्यासारखी!
विधानसभेतही जेमतेमच यश मिळाले आहे. विदर्भात विधानसभेच्या 62 जागा येतात. यापैकी 1999 ते 2019 या दरम्यान झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे संख्याबळ फक्त दोन वेळाच 10 च्यावर गेले आहे. 1999 मध्ये 12, 2004 मध्ये 11, 2009 आणि 2014 मध्ये फक्त एक आणि 2019 मध्ये सहा जागा मिळाल्या. या सहा जणांमधील किंवा स्वतः प्रफुल्ल पटेल हेही महाराष्ट्र सोडा संपूर्ण विदर्भावर छाप पाडताना दिसून येत नाही. प्रफुल्ल पटेल भंडारा-गोंदिया या भागापुरते आणि अनिल देशमुख काटोलपुरते मर्यादित आहेत. त्यातही देशमुख सध्या शरद पवार यांच्याच गटात आहेत.
..तरच अपात्रतेचा निर्णय मागे घेतला जाऊ शकेल; राहुल नार्वेकरांचे सूचक वक्तव्य
तरीही कार्यालय कशासाठी?
अजितदादांकडील अर्थ अणि नियोजन या खात्यांचा नागरिकांशी थेट संबंध तसा कमीच येतो. शिवाय नागपूर जिल्हा हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा म्हणजेच पर्यायाने भाजपचा बालेकिल्ला. त्यामुळे नागपूरमधील नागरिकांच्या काही समस्या असल्यास त्या सोडविण्यासाठी नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्क कार्यालयांबरोबरच भाजपची कार्यालये आहेत. तरीही अजित पवार यांचे नागपूरमध्ये कार्यालय कशासाठी? या कार्यालयाच्या माध्यमातून त्यांचा विदर्भावर डोळा आहे का? असे सवाल विचारले जात आहेत.