आता जे मिळतंय ते घ्या पण, भविष्यात.. ‘लाडकी बहिण’ योजनेवर जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य

आता जे मिळतंय ते घ्या पण, भविष्यात.. ‘लाडकी बहिण’ योजनेवर जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य

Jayant Patil : विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन महायुती सरकारने लाडकी बहिण योजना सुरू केली आहे.  या योजनेत आता महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यासही सुरुवात झाली आहे. राज्य सरकारकडून या योजनेचा मोठा गाजावाजा केला जात आहे. विरोधकांना सावत्र भावाची उपमा देत त्यांच्यापासून सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे. याच घडामोडींवर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाष्य करत महायुती सरकारवर खोचक टीका केली. आता तुम्हाला जे काही मिळतंय ते घ्या, आमची तक्रार नाही. पण राज्यात आमचं सरकार आल्यानंतर ही योजना अधिक विचारीपणे चालवून भगिनींना जास्त ताकदीने मदत करू अशी ग्वाही त्यांनी दिली.

या अर्थसंकल्पाने त्यांचा लोकसभेतील उत्साह संपवला; फडणवीसांचं जयंत पाटील अन् ठाकरेंना उत्तर

मुंबईतील माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात आज महाविकास आघाडीचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.  या मेळाव्यासाठी आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते उपस्थित होते. यावेळी भाषणात जयंत पाटील यांनी भाजप आणि महायुती सरकारवर घणाघाती टीका केली. ते पुढे म्हणाले, आता दोन ते अडीच महिन्यांनंतर निवडणूक होईल. योग्य वेळी आपण सर्वजण एकत्र आलो. असेच एकत्र राहिलो तर राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार येईल. उमेदवार विजयी कसा होईल हे आता आपण पाहू.

भाजपने राज्यातील हिंदू देवस्थानांच्या जमिनी लुटल्या. मी हा विषय विधानसभेत मांडला होता. या जमिनी विकल्या गेल्या. बिल्डरांच्या ताब्यात जमिनी गेल्या आहेत. हिंदू देवस्थानांच्या जमिनी ताब्यात घेण्याचं पाप या लोकांनी केलं. राज्य सरकारचा सगळाच कारभार लुटालुटीचा आहे असा आरोप जयंत पाटील यांनी केला.

मोर्चा आंदोलनापेक्षा ईव्हीएमवर लक्ष ठेवा

लोकसभेला ह्यांनी पैशांचा पाऊस पडला. पण कार्यकर्त्यांनी संघर्ष केला. त्यामुळे आपले 31 खासदार निवडून आले. साताऱ्याची जागाही आपलीच होती. पण येथे पिपाणी चिन्हाने घोळ झाला. या पिपाणीलाच 37 हजारांपेक्षा जास्त मतं गेली. मुंबईतली आमची सीट तर चोरली गेली. त्यामुळे आता कार्यकर्त्यांनी ईव्हीएमवर लक्ष ठेवलं पाहिजे. आपण फक्त मोर्चात आणि आंदोलनात असतो. आता असे करू नका. ईव्हीएमचे कोड पाहा. त्या ठिकाणी तिन्ही पक्षांच्या प्रतिनिधींनी जाऊन बसा. ईव्हीएमचे नंबर घ्या. सील तपासून पाहा. तेच नंबर तिथे जातात का हे पुन्हा मतदान झाल्यानंतर पहा. सील करून ईव्हीएम गोडावून जातं का हे पाहा. नंतर तेच मतमोजणी वेळी उघडलं जात का हे पाहा अशा सूचना जयंत पाटील यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या.

महायुती भक्कम! काँग्रेसची आठ मतं फुटल्याने ‘मविआ’ला तडे; जयंत पाटीलही पराभूत

राज्यातील 31 मतदारसंघांत भाजपला जनतेनं नाकारलं आहे. त्यामुळे सरकार घाबरलं आहे. या गोष्टीची जाणीव झाल्याने सरकार आता प्रचंड घोषणा करत आहे. या घोषणा इतक्या झाल्या की अर्थमंत्र्यांनीच (अजित पवार) मी न वाचता सही करणार नाही असं सांगितलं. मग याचा अर्थ आधी सह्या न वाचताच झाल्या. त्यांचा स्वभाव तसा नव्हता. परिस्थितीनुसार तसं होत असतं. विचार न करता योजना झाल्या. आता सचिव म्हणतो काहीही पाठवू नका मिळणार नाही अशी या सरकारची अवस्था झाली आहे, अशी खोचक टीका जयंत पाटील यांनी केली.

राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. या योजनेत आता तुम्हाला जे काही मिळतंय ते घ्या आमची काही तक्रार नाही. पण भविष्यात राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर या योजना आधिक विचारीपणे आम्ही चालवू आणि तुम्हाला अधिक ताकदीने मदत करू तेव्हा चिंता करू नका अशी ग्वाही जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube