पंजाबमध्ये पुरामुळे कहर! 1996 गावे पाण्याखाली, आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू, 1.75 लाख हेक्टरवरील पिके नष्ट

Heavy rains cause floods in Punjab : पंजाबमध्ये सध्या मुसळधार पावसाचा कहर आहे. पुरस्थिती निर्माण झाली असून अनेक लोक बेघर झाले आहेत. त्यांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. मृतांचा आकडा सतत वाढत आहे. शनिवारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 46 जणांचा मृत्यू झाला असून, 1.75 लाख हेक्टर जमिनीवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. एनडीआरएफ, बीएसएफ, लष्कर, पंजाब पोलिस आणि जिल्हा प्रशासनाच्या पथकांनी मदत आणि बचाव कार्यात सातत्याने काम केले आहे.
सतत येणाऱ्या मुसळधार पावसामुळे (Heavy rain) सतलज, बियास आणि रावी नद्यांमध्ये पूर (Flood) आला आहे. याशिवाय हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये देखील कमी प्रमाणात विनाश नोंदला गेला आहे. पंजाबमध्ये पावसामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली असून नागरिकांच्या अडचणी (Punjab) वाढल्या आहेत.
धरणांची स्थिती
शनिवारी पोंग धरणाची पाणी पातळी 1,394.19 फुट नोंदली गेली, जे अजूनही कमाल मर्यादेपेक्षा चार फुटांपेक्षा जास्त आहे. शुक्रवारी पाण्याचा प्रवाह 99,673 क्युसेक ता, जो शनिवारी कमी होऊन 47,162 क्युसेक झाला. भाक्रा धरणातील पाणी शनिवारी 1,678.14 फुटांवर होते, शुक्रवारी ते 1,678.47 फूट होते. या धरणातून सतलज नदीत पाण्याचा प्रवाह 62,481 क्युसेक आणि विसर्ग 52,000 क्युसेक होता.
सर्वाधिक मृत्यू होशियारपूर आणि अमृतसर मध्ये झाले आहेत, प्रत्येकी 7 जण ठार झाले आहेत. पठाणकोटमध्ये 6, बर्नाला 5, लुधियाना आणि भटिंडा प्रत्येकी 4, मानसा 3, गुरुदासपूर, रूपनगर आणि एसएएस नगर प्रत्येकी 2, पटियाला, संगरूर, फाजिल्का आणि फिरोजपूर प्रत्येकी 1 मृत्यू नोंदला गेला आहे. पठाणकोटमध्ये 3 जण बेपत्ता आहेत.
मदत आणि बचाव
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत 22,854 लोकांना बाधित भागातून बाहेर काढण्यात आले आहे. सुमारे 3.87 लाख लोक या पुरामुळे प्रभावित झाले आहेत. पंजाबचे अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा यांनी सांगितले की, राज्यातील कृषी क्षेत्र, पायाभूत सुविधा, घरे आणि पशुधनावर मोठे नुकसान झाले आहे. राज्यात सुमारे 200 मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत, जिथे 7,000 हून अधिक विस्थापित लोकांना ठेवण्यात आले आहे. एनडीआरएफच्या 24 पथके आणि एसडीआरएफच्या 2 पथके, तसेच 144 बोटी वापरून बचाव कार्य सुरू आहे. होशियारपूरमधील तांडा आणि मुकेरियन उपविभागात भात, ऊस आणि मका यासारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
उपायुक्त आशिका जैन यांनी सांगितले की, नुकसानीचे सविस्तर सर्वेक्षण सुरू आहे. बाधित कुटुंबांना वेळेवर भरपाई देण्यात येईल. कपूरथळा जिल्ह्याचे उपायुक्त अमित कुमार पांचाळ यांनी सांगितले की, बियास नदीत पाण्याचा प्रवाह 1.72 लाख क्युसेक नोंदवला गेला आहे.