मोठी बातमी! संदीप घोष गोत्यात; ‘आरजी कर’ भ्रष्टाचारात 15 ठिकाणी CBI ची छापेमारी
Kolkata Doctor Case : कोलकात्यातील आरजी कर मेडिकल कॉलेज (Kolkata Doctor Case) आणि रुग्णालयाच्या अनेक अधिकाऱ्यांच्या घरी सीबीआयच्या धाडी (CBI Raid) पडल्या आहेत. रविवारी सकाळीच तपास यंत्रणेची वेगवेगळी पथके उत्तर कोलकात्यातील केष्टोपूर, हावडा, एंटाली येथे दाखल झाले आहेत. मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष (Sandeep Ghosh) आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या घरी छापे टाकण्यात आले आहेत. या कारवाईने कोलकात्यात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास एक टीम संदीप घोष यांच्या घरी दाखल झाली. छापा टाकण्याआधी एक तास ही टीम घोष यांच्या घराबाहेरच उभी होती. यानंतर घोष बाहेर आले आणि त्यांनी दरवाजा उघडला. सकाळी आठ वाजता सीबीआयच्या अधिकाऱ्यांना घरात एन्ट्री मिळाली. संदीप घोष यांच्याप्रमाणेच सीबीआयने कॉलेजचे माजी एमएसवीपी संजय बशिष्ट, हावडातील हाटगाचा येथील मेडिकल सप्लायर बिप्लब सिंघा आणि केष्टोपूर येथील फॉरेन्सिक मेडिसीन विभाग प्रमुख देवाशीष सोम यांचीही चौकशी केली जात आहे.
संदीप घोष यांच्या घराची झडती घेण्यासाठी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी केंद्रीय सुरक्षा दलाचा बंदोबस्तही घेतला होता. घराबाहे कोलकाता पोलीस दलाचे एक पथकही दिसून आले. आरजी कर भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयने गु्न्हा दाखल केला आहे. दुसरीकडे एसआयटीने सीबीआयला कागदपत्र दिले आहेत. उच्च न्यायालयाने माजी प्राचार्य संदीप घोष यांच्या कार्यकाळात आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात झालेल्या अनियमिततेचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. न्यायालयाने हा आदेश डॉ. अख्तर अली यांच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान दिला होता.
मी बेकसूर, माझी पॉलीग्राफ टेस्ट करा, कोलकाता बलात्कार हत्या प्रकरणातील आरोपीचा यूटर्न
संदीप घोष यांच्यावर आरोप काय?
अख्तर अली यांनी याचिकेत माजी प्राचार्य संदीप घोष यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक गंभीर आरोप केले होते. जुलै 2023 मध्ये राज्य दक्षता आयोगाला मी लेखी तक्रार दिली होती. पण घोष यांच्यावर काहीच कारवाई झाली नाही. या रॅकेटमध्ये जो कुणी सामील असेल त्या सगळ्यांचाच पर्दाफाश व्हावा अशी माझी इच्छा असल्याचे अली यांनी सांगितले. रुग्णालयात जमा होणाऱ्याा बायोमेडिकल कचऱ्याची बेकायदेशीरपणे विक्री करणे, औषधे आणि विविध उपकरणांच्या पुरवठादारांकडून कमिशन घेऊन टेंडर पास करणे तसेच परीक्षेत पास करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून पाच ते दहा लाख रुपयांची मागणी करणे असे अनेक गंभीर आरोप संदीप घोष यांच्यावर ठेवण्यात आले होते.