काँग्रेसमध्ये होता दबदबा, भाजपमध्ये येताच मंत्रिपद; ‘या’ नेत्यांची चर्चा तर होणारच..

काँग्रेसमध्ये होता दबदबा, भाजपमध्ये येताच मंत्रिपद; ‘या’ नेत्यांची चर्चा तर होणारच..

MP Politics : मध्य प्रदेशाच्या राजकारणात सध्या (MP Politics) नाराजीचे ऐकू येऊ लागले आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. मुख्यमंत्री मोहन यादव (Mohan Yadav) यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री नागर सिंह चौहान राजीनामा देतील असे सांगितले जात आहे. चौहान यांच्याकडील वनविभागाची जबाबदारी रामनिवास रावत यांना देण्यात आली आहे. रावत यांनी नुकताच काँग्रेसचा (Congress) राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता त्यांना वनमंत्री करण्यात आले आहे. रावत यांना थेट कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आल्याने भाजपमधील वरिष्ठ नेते कमालीचे नाराज झाले आहेत.

मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळात आणखीही असे काही मंत्री आहेत ज्यांचं आधी काँग्रेसमध्ये वजन होतं. भाजपमध्ये आल्यानंतर भाजपने त्यांना थेट मंत्रिपदाची संधी दिली. दलबदलू नेत्यांना पायघड्या घातल्या जात असल्याने पक्षाचे निष्ठावंत नेते आणि कार्यकर्ते चांगलेच नाराज झाले आहेत. या कारणामुळे भाजपला लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याचे सांगितले जात आहे.

काँग्रेस अन् भाजप सरकार, मंत्रिपद कायम

इंदोरमधील सांवेर मतदारसंघाचे आमदार तुलसी सिलावट राज्य सरकारमध्ये जलसंपदा मंत्री आहेत. माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांच्या सरकारमध्ये सुद्धा सिलावट मंत्री होते. सन 2020 मध्ये सिलावट यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. सन 2018 मध्ये ज्यावेळी राज्यात काँग्रेसच सरकार होतं तेव्हाही सिलावट त्या सरकारमध्ये मंत्री होते. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे निकटवर्तीय म्हणून सिलावट ओळखले जातात. सिंधिया यांना पाठिंबा देत त्यांनी काँग्रेस सोडली होती.

शरद पवारांना धक्का! लेडी जेम्स बाँडचा काँग्रेसमध्ये प्रवेश; दुहान निवडणूक लढणार?

प्रद्युम्न सिंह तोमर

ग्वालियर येथील माजी आमदार प्रद्युमन सिंह तोमर मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहेत. तोमर यांनीही सन 2020 मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. नंतर त्यांनी भाजपाचा (BJP) झेंडा हाती घेतला होता. माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारमध्ये सुद्धा तोमर मंत्री होते. आता मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळात ऊर्जा मंत्री आहेत.

गोविंद सिंह राजपूत

सागर जिल्ह्यातील सुरखी विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोविंद सिंह राजपूत देखील ज्योतिरादित्य सिंधिया यांचे समर्थक आहेत. गोविंद सिंह भाजप सरकारमध्ये दुसऱ्यांदा मंत्री बनले आहेत. शिवराज सिंह चौहान यांच्या कार्यकाळात सुद्धा राजपूत मंत्री होते. आता मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळात अन्न व नागरी पुरवठा मंत्री आहेत. काँग्रेस नेते कमलनाथ (kamalNath) यांच्या मंत्रिमंडळात काँग्रेसने त्यांना मंत्रिपदाची जबाबदारी दिली होती.

एंदल सिंह कंसाना

मुरैना जिल्ह्यातील एंदल सिंह कंसाना यांनी सन 2020 मध्ये काँग्रेसचा राजीनामा दिला होता. यानंतर शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती. परंतु पुढे झालेल्या पोटनिवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला होता. यानंतर 2023 मध्ये पुन्हा निवडून आल्यानंतर कंसाना यांना कृषीमंत्री करण्यात आले.

आठ हजार विद्यार्थी परतले, बांग्लादेशवर नजर पण.. सर्वपक्षीय बैठकीत सरकारचा खुलासा

रामनिवास रावत

तब्बल सहा वेळा निवडून आलेले रामनिवास रावत भाजपच्या निशाण्यावर आहेत. लोकसभा निवडणुका (Lok Sabha Elections) सुरू असतानाच रावत भाजपात सहभागी झाले होते. कालांतराने त्यांना मंत्री करण्यात आले. आता त्यांच्याकडे वन खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांच्या कार्यकाळात सुद्धा रावत मंत्री राहिले आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube