Video : भलतंच घडलं! आरोपीला वाचविण्यासाठी पोलिसांची जीप दवाखान्यात घुसली, वॉर्डात फिरली
Uttarakhand News : पोलीस आरोपीला पकडण्यासाठी जंग जंग पछाडतात. प्रसंगी जिवाची बाजीही लावतात. पण, पोलिसच आरोपीच्या संरक्षणासाठी थेट हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या वॉर्डात कार घेऊन जात असतील तर.. ऐकायला थोडं विचित्र अन् संतापजनक वाटेल. हा प्रसंग घडलाय ऋषीकेशमधील (उत्तराखंड) एका हॉस्पिटलमध्ये. पण, पोलिसांनी असं का केलं तर यामागे कारणही तसंच होतं. आता पोलिसांच्या या करारनाम्याची जोरदार चर्चा होत असून सोशल मीडियावर व्हिडिओही व्हायरल होऊ लागले आहेत.
पोलिसांनी या हॉस्पिटलमधील एका आरोपी कर्मचाऱ्याला संतप्त डॉक्टरांपासून संरक्षण (Uttarakhand News) देण्यासाठी बोलेरो जीप चक्क रुग्णांसाठीच्या जनलरल वॉर्डात नेली. हॉस्पिटलमधील एका नर्सिंग अधिकाऱ्याने ऑपरेशन थिएटरमध्ये महिला डॉक्टरसोबत छेडछाड केली असा आरोप आहे. या आरोपीला येथील संतप्त डॉक्टरांपासून संरक्षण देण्याच्या उद्देशाने ही कार्यवाही केल्याचे सांगण्यात येत आहे.
Uttarakhand Tunnel Rescue : ‘सुरुवातीचे 24 तास आमच्यासाठी’.. कामगाराने सांगितलं 17 दिवसात काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, 19 मे रोजी ऋषिकेश येथील दवाखान्यातील ऑपरेशन थिएटरमध्ये सर्जरी सुरू होती. याचवेळी येथील नर्सिंग अधिकाऱ्याने महिला डॉक्टरची छेडछाड केली असा आरोप होत आहे. या घटनेमुळे रुग्णालयातील डॉक्टर प्रचंड संतापले. येथेच त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. इतकेच नाही तर डॉक्टरांनी डीन कार्यालयाला घेराव घातला.
या प्रकाराची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपी नर्सिंग ऑफिसरविरोधात केस दाखल करून कारवाईला सुरुवात केली. या आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस दवाखान्यात पोहोचले. कडेकोट बंदोबस्तात आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पण, येथील वातावरण पाहता खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी त्यांची बोलेरो जीप थेट रुग्णांच्या वॉर्डात घुसवली. या दरम्यान सिक्युरिटी गार्डने शिट्टी वाजवत वाटेत येणारे स्ट्रेचर हटवत होते. वॉर्डात आलेली पोलिसांची जीप पाहून रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक सुद्धा हैराण झाले होते.
The cops drove their car inside AIIMS Rishikesh.pic.twitter.com/rZDkCvHipM
— Divya Gandotra Tandon (@divya_gandotra) May 22, 2024
पोलिसांचं म्हणणं आहे की छेडछाड करणारा नर्सिंग अधिकारी मूळचा राजस्थानचा आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास केला जात आहे. उत्तराखंड महिला आयोगाच्या अध्यक्षांनी हॉस्पिटलचा दौरा करत आरोपा विरोधात कठोर कारवाईची मागणी केली होती. 21 मे रोजी ऋषीकेशमध्ये संबंधित महिला डॉक्टरने तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीच्या आधारे तत्काळ कारवाई करत आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.