“हा सरसकट जीआर नाही, पुराव्यांचा GR, भुजबळांना आम्ही..”, मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय सांगितलं?

Devendra Fadnavis on Chhagan Bhujbal : राज्य सरकारने हैद्राबाद गॅझेट लागू करण्याचा जीआर काढला. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले. दुसरीकडे मात्र या निर्णयावरून ओबीसीत अस्वस्थता वाढली आहे. सरकारच्या या निर्णयाचा ओबीसी नेत्यांनी जोरदार विरोध केला आहे. राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी तर न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. तसेच काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवरही त्यांनी बहिष्कार टाकाला होता. या सगळ्या घडामोडींवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. छगन भुजबळ यांची नाराजी आम्ही नक्कीच दूर करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
फडणवीस यांनी आज प्रसारमाध्यमांशी (Devendra Fadnavis on Chhagan Bhujbal) संवाद साधला. हैद्राबाद गॅझेट संदर्भात सरकारने काढलेल्या निर्णयाच्या विरोधात ओबीसी नेते न्यायालयात जाणार आहेत. मंत्री छगन भुजबळ सुद्धा नाराज आहेत त्यांनी काल मंत्रिमंडळाच्या बैठकीवरही बहिष्कार टाकला (Cabinet Meeting) होता असे पत्रकारांनी त्यांना विचारले. यावर फडणवीस म्हणाले, छगन भुजबळ साहेब बैठक सोडून कुठेही गेलेले नव्हते. त्यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे. मी त्यांना आश्वस्त केले की हा जो काही जीआर आपण काढला आहे त्यामुळे ओबीसी समाजावर कोणताही परिणाम होणार नाही. हा सरसकट जीआर नाही. हा पुराव्याचाच जीआर आहे.
छगन भुजबळ यांचं ओबीसी नेत्यांना आवाहन, मराठा आरक्षणाच्या GR विरोधात आंदोलनाची तयारी
आम्ही भुजबळांच्या शंका दूर करू
फक्त मराठवाड्यात त्याकाळी इंग्रजांचं राज्य नव्हतं. तिथे निजामाचा अंमल होता. त्यामुळे इंग्रजांच्या राज्यातले पुरावे इतर ठिकाणी मिळतात मराठवाड्यात मिळत नाहीत. मराठवाड्यातले पुरावे हैद्राबाद गॅझेटमध्ये मिळतात. त्यामुळे तिथले पुरावे आपण ग्राह्य धरलेले आहेत. त्यामुळे त्या पुराव्यांच जे खरे कुणबी आहेत त्यांनाच प्रमाणपत्र मिळणार आहे. जे खरे हक्कदार आहेत त्यांना मिळणार आहे. कुणालाही खोटेपणा करता येणार नाही अशा प्रकारचा हा जीआर आहे. अनेक ओबीसी संघटनांनी या जीआरचं स्वागत केलं आहे. आमच्या मनात शंका नाही असं अनेकांनी सांगितलं आहे. भुजबळ साहेबांच्या मनातली शंका आम्ही दूर करू.
जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत ओबीसींवर अन्याय होऊ शकत नाही हे ओबीसी नेत्यांनाही माहित आहे. एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला देण्याचा विचार होऊ शकत नाही. आम्ही मराठ्यांचं मराठ्यांना आणि ओबीसींचं ओबीसींना देणार. ज्यांचा खरा अधिकार आहे त्यांनाच देणार. दोन समाजांना कधीच एकमेकांसमोर आणणार नाही.
मी त्यांचे (संजय राऊत) आभार मानतो आणि सांगू इच्छितो की अनेक वेळा समजुती गैरसमजुती होतात. काही लोकं जाणीवपूर्वक गैरसमजुती तयार करतात. पण आम्ही जे काही राजकारण शिकलो ते सगळ्यांना सोबत घेऊन आम्हाला पुढे जायचं आहे. मराठा समाज महत्वाचा समाज आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत मराठा समाजानं मोठं योगदान दिलं आहे. त्यामुळे या समाजाचं कल्याण झालंच पाहिजे असेही फडणवीस यांनी सांगितले.
Chhagan Bhujbal : आठ आमदार निवडून आणून दाखव.. भुजबळांचं थेट जरांगेंना चॅलेंज