काँग्रेसचं चाललंय काय? आमदार अन् उमेदवारांची बैठक; पराभवाचं उत्तर मिळणार..

  • Written By: Published:
काँग्रेसचं चाललंय काय? आमदार अन् उमेदवारांची बैठक; पराभवाचं उत्तर मिळणार..

प्रशांत गोडसे, मुंबई | महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला (Ramesh Chennithala) येत्या मंगळवारी (१७ डिसेंबर) काँग्रेस पक्षाचे (Congress) नवनिर्वाचित विधानसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य व २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील पक्षाचे सर्व उमेदवार यांच्याशी नागपूरमध्ये चर्चा करणार आहेत. नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात ही चर्चा होणार आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता आमदारांशी तर दुपारी १ वाजता विधानसभा निवडणुकीतील (VidhanSabha) उमेदवारांशी स्वतंत्रपणे चर्चा करणार आहेत.

नागपूर येथे होत असलेल्या या महत्वपूर्ण चर्चेला संबंधित सर्वांनी उपस्थित रहावे असे निर्देश महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी दिली. काँग्रेसच्या या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. काँग्रेसलाही मोठा धक्का बसला. काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते या निवडणुकीत पराभूत झाले. कसेतरी 16 आमदार निवडून आले. लोकसभा निवडणुकीतील कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. काँग्रेसचा स्ट्राईक रेटही कमालीचा घसरला. निवडणुकीत इतका मोठा पराभव पदरी का पडला याची कारणं शोधली जात आहेत. यातच काँग्रेस नेत्यांकडून पराभवाचं खापर ईव्हीएमवर देखील फोडलं जात आहे. या घडामोडी घडत असतानाच काँग्रेस नेतृत्वाने मोठी बैठक आयोजित केली आहे.

या बैठकीत पक्षाचे आमदार, निवडणुकीतील सर्व उमेदवार यांच्याशी काँग्रेस नेते चर्चा करणार आहेत. यामागे काय उद्देश आहे याची माहिती अजून समोर आलेली नाही त्यामुळे बैठकीआधी विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube