रोहित पाटील, श्रीजया चव्हाण ते सुमित वानखेडे…विधानसभेतील अठरा तरुण चेहरे

Maharashtra Legislative Assembly: विधानसभेत चाळीसहून कमी वय असलेले तब्बल 18 तरुण चेहरे गेलेत. त्यात सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपचे नऊ चेहरे.

  • Written By: Published:
Eighteen young faces in Maharashtra Legislative Assembly

राज्याच्या राजकारणात 2024 ची विधानसभा निवडणूक (Maharashtra Legislative Assembly) ही बहुरंगी, बहुढंगी ठरलीय. लोकसभेला सपाटून मार खाणाऱ्या महायुतीने विधानसभेत कमाल करत 234 जागा जिंकत एेतिहासिक कामगिरी केलीय. या निवडणुकीची आता वर्षपूर्ती झाली असून, विधानसभेत चाळीसहून कमी वय असलेले तब्बल 18 तरुण चेहरे गेलेत. त्यात सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपचे (BJP) नऊ चेहरे आहेत, दोन्ही शिवसेना (Shivsena) व दोन्ही राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन आणि शेकापचा एक चेहरा आहे. हे आमदार कोण आहेत त्याची यादीच पाहुया…

रोहित पाटील सर्वात तरुण आमदार

राज्याच्या विधानसभेत सर्वात तरुण आमदार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पाटील हे आहेत. ते अवघ्या 25 वर्षी सांगलीतील तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांनी माजी खासदार व राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार संजयकाका पाटील यांचा तब्बल 27 हजार मतांनी पराभव केला. रोहित पाटील हे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर. आर. पाटील यांचे चिरंजीव आहेत. राष्ट्रवादीतील तरुण चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचे शिक्षण मुंबईत झालेले असून, ते बीबीएचे पदवीधर आहेत. (Eighteen young faces in Maharashtra Legislative Assembly)

करण देवतळे अवघ्या 29 वर्षांत विधानसभेत

विधानसभेत दुसरा तरुण चेहरा आहे करण संजय देवतळे. ते चंद्रपूरमधील वरोरा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटवर निवडून आले आहे. ते 29 वर्षांचे असून, ते नागपूर येथील यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयातून बीई सिव्हिल झालेले असून, व्यवस्थापनातील एमबीए पदवी त्यांनी घेतलेली आहे. त्यांना मोठा राजकीय वारसा आहे. त्यांचे वडिल संजय देवतळे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहिलेले आहे. ते चार टर्म काँग्रेसचे आमदार राहिलेले आहेत.

दिग्गज कुणाल पाटलांचा पराभव करणारे राघवेंद्र भदाणे-पाटील

विधानसभेतील आणखी एक तरुण चेहरा आहे, धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र भदाणे-पाटील. ते अवघ्या 31 व्या वर्षी आमदार झालेत. भाजपच्या तिकीटावर त्यांनी दिग्गज काँग्रेस नेते व धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांचा तब्बल 66 हजार मतांनी पराभव केलाय. त्यांना तब्बल 1 लाख 70 हजार मते मिळाली होती.

वरुण सरदेसाई

या यादीत चौथे नाव आहे वरुण सरदेसाई यांचे. ते वांद्र पूर्व मतदारसंघातून 32 व्या वर्षी ठाकरे शिवसेनेकडून आमदार झालेले आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे व वरुण सरदेसाई हे मावसभाऊ आहेत. वरूण सरदेसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांचा पराभव केलाय.

श्रीजया चव्हाण

या यादीत पाचवे नाव अॅड. श्रीजया अशोक चव्हाण यांचे आहे. त्या 32 वर्षांच्या असून, नांदेडमधील भोकर मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर त्या पहिल्यांदा निवडून आल्यात. माजी मुख्यमंत्री व भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांच्या त्या ज्येष्ठ कन्या आहेत.

आदित्य उद्धव ठाकरे

आदित्य उद्धव ठाकरे हे सर्वात कमी वयाचे सहावे आमदार आहेत. 34 वर्षीय आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून सलग दोनदा विजयी झालेत. या निवडणुकीत शिंदे सेनेचे मिलिंद देवरा आणि मनसेचे संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला. पण आदित्य ठाकरेंनी साडेआठ हजार मतांनी बाजी मारली आहे. वडिल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते त्यांच्या मंत्रिमंडळात पर्यावरण मंत्री होते.

जितेंद्र अंतापूरकर

जितेंद्र अंतापूरकर हे नांदेड जिल्ह्यातील देगलूर मतदारसंघाचे आमदार असून, ते 34 वर्षांचे आहेत. त्यांचे वडिल रावसाहेब अंतापूरकर काँग्रेसचे आमदार होते. कोरोनाकाळात त्यांचे निधन झाले. पोटनिवडणुकीत त्यांचा मुलगा जितेंद्र अंतापूरकर हे निवडून आले होते. परंतु ते अशोक चव्हाण यांचे जवळचे असल्याने तेही भाजपात गेले आणि विजय आहे. सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे हेही युवा आमदार आहेत. ते 34 वर्षांचे आहेत. सोलापूर शहर काँग्रेसचा बालेकिल्ला असताना कोठे यांनी तेथे कमळ फुलविले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सना मलिक

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सना मलिक हे अणुशक्तीनगरमधून 37 व्या वर्षी पहिल्यांदा आमदार झाल्या आहेत. माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या त्या कन्या आहेत.

बाबासाहेब देशमुख

सांगोला मतदारसंघ शेकापचा बालेकिल्ला मानला जातो. येथून बाबासाहेब देशमुख हे 37 व्या वर्षी आमदार झाल्यात. ते स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे नातू असून, त्यांनी शिंदे सेनेचे शहाजीबापू पाटील यांना धूळ चारलीय.

विलास भुमरे

पैठण मतदारसंघ माजी मंत्री व खासदार संदिपान भुमरे यांचा बालेकिल्ला राहिला आहे. भुमरे हे संभाजीनगरचे खासदार झाल्यानंतर त्यांचा मुलगा विलास भुमरे येथून विजय झाले आहेत. ते 38 वर्षांचे आहेत.

हितेंद्र ठाकुरांची सद्दी संपविणाऱ्या स्नेहा दुबे-पंडित

वसई मतदारसंघाच्या भाजप आमदार स्नेहा दुबे- पंडित याही 38 वर्षांच्या आहेत. स्नेहा डुबे यांनी वसई-विरारवर 35 वर्षांपासून एकहाती वर्चस्व असलेले हितेंद्र ठाकूर यांचा पराभव केला. त्यामुळे त्या चर्चेत आहेत.

सलग दुसऱ्यांदा विजय आणि मंत्रिपद

दापोली विधानसभा मतदारसंघातून 38 वर्षीय योगेश कदम हे सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले आहे. ते माजी मंत्री रामदास कदम यांचा मुलगा आहे. सलग दोनदा निवडून आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योगेश कदमांना मंत्रिमंडळात स्थान दिलंय.

अहिल्यानगरमधील तीन युवा आमदार

अहिल्यानगर जिल्ह्यातून तीन युवा आमदार हे विधानसभेत गेले आहेत. अहिल्यानगर शहर मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप हे तिसऱ्यांदा विधानसभेत गेले आहेत. तर माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचा मुलगा विक्रम पाचपुते हे भाजपच्या तिकीटावर पहिल्यांदा विधिमंडळात गेले. तर कर्जत-जामखेड मतदारसंघातून रोहित पवार हे सलग दुसऱ्यांदा आमदार झाले. दोन्ही त्यांनी भाजपचे प्रा. राम शिंदे यांना पराभवाचा झटका दिलाय. तिन्ही आमदार हे 39 वर्षांचे आहेत.

सुमित वानखेडे

सुमित वानखेडे हे वर्धातील आर्वी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आलेत. चाळीस वर्षीय वानखेडे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी पीए राहिलेले आहेत.

संतोष दानवेंची विजयाची हॅटट्रीक

माजी खासदार व मंत्री रावसाहेब दानवे यांचे पूत्र संतोष दानवे हे जालन्यातून भोकरदन मतदारसंघातून सलग तीनदा विजयी झाले आहेत. ते चाळीस वर्षांचे आहेत. तिन्ही वेळेस त्यांनी राष्ट्रवादीचे चंद्रकांत दानवे यांच्या पराभव केलाय. चाळीस वर्षांत आत वय असलेले राज्याच्या विधिमंडळात 18 आमदार आहेत. परंतु या आमदारांची कामगिरी कशी वाटतेय, ते कमेंट करून सांगा.

follow us