पोटदुखी, अशक्तपणा, अन् ग्लानी तरीही जरांगे मागणीवर ठाम; उपोषणाचा सहावा दिवस

पोटदुखी, अशक्तपणा, अन् ग्लानी तरीही जरांगे मागणीवर ठाम; उपोषणाचा सहावा दिवस

Manoj Jarange News : मराठा आरक्षण सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. मागील पाच दिवसांपासून त्यांचं आमरण उपोषण सुरु असून आजचा सहावा दिवस आहे. उपोषणाच्या पहिल्या दिवसांपासून मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी अन्नपाणी आणि उपचाराविना आंदोलन सुरु ठेवलं आहे. अखेर आज त्यांना पोटदुखी, अशक्तपणा, आणि ग्लानीचा त्रास सुरु झाला आहे. त्रास होत असला तरीही मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला असून जोपर्यंत अध्यादेशाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत उपोषण सुरुच राहणार असल्याचा पवित्राच मनोज जरांगे पाटलांनी घेतला आहे.

Jitendra Awhad : “पुतण्या गद्दार निघाला!” आव्हाडांची जहरी टीका; मिटकरींचाही पलटवार

उपोषणाच्या सहाव्या दिवशी अखेर मंहतांच्या आग्रहानंतर मनोज जरांगे यांनी पाणी प्राशन केलं आहे. काल जरांगे यांना अशक्तपणा आल्यामुळे डॉक्टरांकडून त्यांना सलाईन लावण्यात आली होती. मात्र, मनोज जरांगे यांच्या लक्षात येताच त्यांनी सलाईन तोडून टाकल्याचं दिसून आलं आहे. मनोज जरांगे यांनी महंतांच्या शब्दाला मान देत पाणी प्राशन केलं खऱं पण उपचार घेण्यास त्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांची प्रकृती खालावत चालली असल्याचं दिसून येत आहे.

काँग्रेसला मोठा धक्का : कार्यकारी अध्यक्षाचा तीन आमदारांसह भाजपच्या सरकाराला थेट पाठिंबा

मनोज जरांगे यांनी पुन्हा आंदोलनाचं हत्यार उपसल्याने सरकारची पुन्हा एकदा चांगलीच कोंडी झाली आहे. मनोज जरांगे यांचं उपोषण सुरु होताच राज्य सरकारवर चांगलाच दबाव वाढत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून मनोज जरांगे यांच्या उपोषणाची दखल घेत मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी येत्या 20 फेब्रुवारीला विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवण्यात येणार असल्याचं समजतंय. अशातच आता या एकदिवसीय अधिवेशनाला राज्य मंत्रिमंडळाकडून मान्यताही देण्यात आली आहे.

आधी कायद्याची अंमलबजावणी मगच सरकारने सलाईन लावावी…
सरकारने येथे येऊन मला सलाइन लावावे आणि कायद्याची अंमलबजावणी करावी. अधिकाऱ्यांनी त्यांच्या डॉक्टरांचे पथक घेऊन यावे, कायद्याची अंमलबजावणी करावी, मग माझ्यावर उपचार करावे. आपल्या लोकांनी मला सलाइन लावण्याऐवजी सरकारला धारेवर धरावे. मला सलाइन लावायला कोण-कोण होते मला माहीत नाही, त्यांनी झोपेत मला सलाइन लावले. मी ते काढून टाकले असून जोपर्यंत सरकार अंमलबजावणी करीत नाही तोपर्यंत उपचार घेणार नसल्याचं मनोज जरांगेंनी सांगून टाकलं आहे.

दरम्यान, राज्य सरकारकडून मराठा कुणबी समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण, सगेसोयऱ्यांनाही कुणबीचे दाखले देण्याबाबतचा अध्यादेश मनोज जरांगे यांच्या पदयात्रेदरम्यान काढला होता. राज्य सरकारच्या अध्यादेशानंतर मनोज जरांगे यांनी पदयात्रेचं आंदोलन स्थगित केल्याचं पाहायला मिळालं. आता पुन्हा एकदा त्यांनी उपोषण सुरु केल्याने 20 फेब्रुवारीला होणाऱ्या विशेष अधिवेशनात सरकार कोणती भूमिका घेणार? याकडं संबंध समाजबांधवांंचं लक्ष लागून राहिलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube