सांगलीवरुन मविआत घमासान! कदम-पाटलांची दिल्लीवारी, चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीवर टाच?
Sangli Loksabha : सांगली लोकसभा मतदारसंघावरुन (sangli loksabha) महाविकास आघाडीमध्ये जोरदार घमासान सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. आधीपासूनच सांगलीच्या जागेसाठी काँग्रेसकडून प्रयत्न केले जात असतानाच उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी जाहीर सभेत पैलवान चंद्रहार पाटलांची (Chandrahar Patil) उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे सांगलीत काँग्रेसच्या नेत्यांमध्ये धूसफुस सुरु आहे. उमेदवार बदलण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे नेते विश्वजित कदम, (Vishwajit Kadam) विशाल पाटलांकडून (Vishal Patil) फिल्डींग लावण्यात येत आहे.
महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेसाठी काँग्रेसच्या नेत्यांकडून आग्रह धरला जात आहे. सांगलीच्या उमेदवाराबाबत काँग्रेस नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. काही दिवसांपूर्वीच विश्वजित कदमांसह विशाल पाटलांनी दिल्लीत काँग्रेसच्या हाय कमांडची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली होती. मात्र, अद्याप सांगलीच्या जागेबाबत काँग्रेसच्या हाय कमांडच्या नेत्यांकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सांगलीच्या जागेबाबत समाधानकारक तोडगा निघाला नाही तर विश्वजित कदम आणि विशाल पाटील मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव काँग्रेस हाय कमांडच्या नेत्यांसमोर मांडणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
भाजपाची चांदी; खिंड लढवणाऱ्या काँग्रेसच्या ‘या’ नेत्यांनी निवडणुकीआधीच ‘हात’ सोडला..
काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे गटाकडून सांगलीत जाहीर सभा घेण्यात आली होती. त्यावेळी महाविकास आघाडीत जागावाटपांबाबत चर्चा सुरुच होती. सांगली लोकसभा उद्धव ठाकरे गटाला जाणार असल्याची माहिती पडद्याआड होती. मात्र, याच सभेत उद्धव ठाकरे यांनी सांगली लोकसभेसाठी चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. त्यानंतर काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी पसरली होती. अखेर ही नाराजी बाहेर आली असून सांगलीच्या जागेसाठी विशाल पाटलांसह विश्वजित कदम यांची वारी दिल्लीला निघाली आहे.
शिक्षण विभागाकडून RTE नियमांमध्ये बदल; प्राधान्यक्रमानुसारच शाळेमध्ये प्रवेश घ्यावा लागणार
काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आज दुपारच्या सुमारास खाजगी विमानातून नवी दिल्लीला निघाल्याची माहिती समोर आली आहे. कदमांसह विशाल पाटील हे देखील खाजगी विमानाने नवी दिल्लीत जात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर आता काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून सांगलीच्या जागेबाबत कोणता निर्णय घेण्यात येईल? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.