सांगली : ‘वसंतदादांच्या नातवाला’ काँग्रेसचा ग्रीन सिग्नल; तर ‘देशमुखांच्या’ तयारीने भाजप पेचात

सांगली : ‘वसंतदादांच्या नातवाला’ काँग्रेसचा ग्रीन सिग्नल; तर ‘देशमुखांच्या’ तयारीने भाजप पेचात

‘पाटलांचा मतदारसंघ’. सांगली लोकसभा मतदारसंघाच्या वर्णनाला हा एकच शब्द पुरेसा ठरतो. याचे कारण पक्ष कोणताही असो, उमेदवार कोणीही असो पण तो ‘पाटील’ असतो हे नक्की. आतापर्यंत 16 पंचवार्षिक आणि दोन पोटनिवडणूक अशा एकूण 18 निवडणुकांपैकी तब्बल 15 वेळा या मतदारसंघातून ‘पाटील’ आडनावाचा उमेदवार निवडून गेला आहे. यात महाराष्ट्राचे गाजलेले मुख्यमंत्री वसंतदादा पाटील (Vasantdada Patil) यांच्यापासून ते काँग्रेसच्या (Congress) अभेद्य बालेकिल्ल्यात भाजपचे पहिल्यांदा कमळ फुलविलेल्या संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil) यांच्यापर्यंत नाव घ्यावे लागते.

यंदाही काँग्रेसकडून विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील तयारी करत आहेत. तर भाजपकडून संजयकाका पाटील हेही तिसऱ्यांदा उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. पण याच पाटलांच्या गढीत देशमुखांचीही तयारी सुरु आहे. त्यांचा धसका विशाल पाटील अन् संजयकाकांनीही घेतला आहे. या देशमुखांच्या एन्ट्रीने आतापर्यंत दुहेरी झालेली सांगलीतील लढत आता तिहेरी होण्याची शक्यता आहे. नेमके कोण आहेत हे देशमुख आणि त्यांनी या निवडणुकीत कशी रंगत आणली? (Vishal Patil from Congress and Sanjay Patil from BJP are trying to get candidature in Sangli Lok Sabha Constituency)

 सांगली लोकसभा मतदारसंघाची रचना :

सांगली लोकसभा मतदारसंघात पलूस कडेगाव, जत, तासगाव-कवठेमंहकाळ, खानापूर, सांगली आणि मिरज अशा सहा मतदारसंघांचा समावेश होतो. यापैकी पलूस कडेगाव, जत, तासगाव-कवठेमंहकाळला महाविकास आघाडीचे आमदार आहेत तर खानापूर, सांगली मिरज येथे महायुतीचे आमदार आहेत. काँग्रेस आणि भाजपा दोन्हीही बाजूने समानचित्र आहे. नेमके कोण कोणावर वरचढ ठरते आणि लोकसभेचा सामना कसा रंगतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

 सांगली लोकसभा मतदारसंघाचा इतिहास :

आजपर्यंतचा इतिहास पाहिल्यास सांगलीचा मतदारसंघ काँग्रेसचा आणि त्यातही वसंतदादांचा बालेकिल्ला राहिला आहे. जवळपास 29 वर्ष वसंतदादांच्या घरात खासदारकी होती. वसंतदादा पाटील, शालिनी पाटील, मदन पाटील, प्रकाशबापू पाटील, प्रतिक पाटील अशा दिग्गजांनी या मतदारसंघातून काँग्रेसचे प्रतिनिधित्व केले. 2014 ला मात्र मोदी लाटेने या मतदारसंघातील काँग्रेसचे प्राबल्य मोडित काढले.

एकाच म्यानात दोन तलवारी राहु शकत नाहीत या उक्तीप्रमाणे एकाच तालुक्यात दोन नेते एकाच पक्षात राहु शकत नाहीत. आर. आर पाटील यांचे कट्टर विरोधक मानल्या जाणाऱ्या संजयकाकांनी निवडणुकीच्या तोंडावर आमदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला आणि मोदी लाटेत लोकसभा गाठली. त्यांनी प्रतिक पाटलांचा अडीच लाख मतांनी पराभव केला.

त्यानंतर हा वारसा प्रकाशबापुंचे दुसरे चिरंजीव आणि प्रतिक पाटील यांचे लहान बंधू विशाल पाटील यांनी मतदारसंघाची सुत्रे हाती घेतली. पण 2019 ला आघाडी धर्म म्हणत काँग्रेसने मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडला. विशाल पाटलांनी स्वाभिमानीचे तिकीट घेतले. त्यांनी निकराची लढाई केली. पण संजयकाकांनी 1 लाख 64 हजारांच्या मताधिक्याने त्यांचा पराभव केला.

सद्यस्थिती :

आता पुन्हा एकदा या मतदारसंघात महाविकास आघाडीतून विशाल पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. तर भाजपकडून तिसऱ्यांदा उमेदवारी मिळविण्यासाठी संजयकाकांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. पण त्याचवेळी पृथ्वीराज देशमुख यांनी मुंबई-दिल्लीला जाऊन भाजपकडून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु केल्याने रंगत आली आहे. संजय पाटील यांच्यासमोर पृथ्वीराज देशमुख यांच्या रूपाने प्रबळ दावेदार समोर आल्याने भाजपासमोर सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोण आहेत पृथ्वीराज देशमुख?

माजी आमदार संपतराव देशमुख यांचा वारसा लाभलेल्या पृथ्वीराज देशमुख यांची राजकीय वाटचाल आजवर संघर्षातून उभा राहिलेली आहे. 1996 सालच्या पोटनिवडणूकीत पतंगराव कदम या मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये असलेल्या नेत्यांचा पराभव करत ते विधिमंडळ सभागृहात पोहोचले. त्यावेळी शिवसेना-भाजपाचे सरकार होते पण मॅजिक फिगर काटावरची होती. त्यामुळे देशमुख यांच्यासारख्या बंडखोरांना नेहमीच झुकते माप दिले जात होते. याचा फायदा उठवत देशमुख यांनी मतदारसंघातील विकासकामे आणि पाणीयोजनाना निधी आणला.

1999 साली काँग्रेस पक्षातील फुटीनंतर देशमुखांनी राष्ट्रवादीची वाट धरली. यावेळी झालेल्या निवडणुकीत पतंगराव कदम यांच्याकडून ते पराभूत झाले. नंतर 2004 विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता 2009, 2014 या निवडणुकीत अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली पण त्यांना अपयश आले. 2014 च्या दरम्यान झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा आघाडीधर्म न पाळता संजय पाटील यांना मदत केली आणि काही दिवसातच त्यांनीही भाजपचा रस्ता धरला.

या दरम्यान त्यांना काही महिने मुदतीची विधानपरिषदेवर संधी मिळाली. पण त्यांना 2014 नंतर कोणतीही निवडणूक लढवता आलेली नाही, आता लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. मोठा जनसंपर्क, लोकांच्या साध्या साध्या कामासाठी फोन करणे, विरोधकांशी सुद्धा टोकाचा संघर्ष न करता व्यक्तिगत संबंध जपणे, भाजपामधील वरिष्ठ नेत्यांसोबतचा जिव्हाळा, भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंध ही त्यांची बलस्थाने आहेत. भाजपामधील वरिष्ठाच्या सूचनेनुसार त्यांच्या हालचाली सुरु आहेत असेही सांगितले जात आहे. या सगळ्यामुळेच भाजपाची उमेदवारी हा आगामी काही दिवसात कळीचा मुद्दा होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube