भाजपचे कार्यकर्ते वागळेंसह पुरोगाम्यांवर तुटून पडलेले त्यावेळी भक्ती कुंभार थेट भिडल्या…

भाजपचे कार्यकर्ते वागळेंसह पुरोगाम्यांवर तुटून पडलेले त्यावेळी भक्ती कुंभार थेट भिडल्या…

पुणे : भाजपचे आक्रमक कार्यकर्ते, काही गुंड अन् लक्ष्य होते निखील वागळेंची गाडी. पुण्याच्या (Pune) रस्त्यावर शुक्रवारी रात्री ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे (Nikhil Wagale), सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी (Vishwambhar Choudhari) आणि अॅड. असीम सरोदे या पुरोगामी कार्यकर्त्यांवर झालेला संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला. आधी प्रभात रोडवरील इराणी कॅफेजवळ, मग गरवारे कॉलेजच्या पुढे त्यानंतर सेनादत्त पोलीस चौकीच्या सिग्नलवर आणि शेवटी दांडेकर पुलावर. चार ठिकाणी चारवेळा त्यांच्या गाडीवर हल्ला झाला.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आणि काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते अशा अनेकांनी त्यांच्या गाडीला कडे करुन संरक्षण दिले अन् ही मंडळी निर्भय बनोच्या सभास्थळी पोहचले. या सगळ्यांनीच दाखविलेल्या धाडसाचे सध्या सोशल मिडीया आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड कौतुक होत आहे. पण यातही एका युवतीच्या धाडसाची सर्वात जास्त चर्चा होत आहे. ही युवती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाच्या युवती शहर उपाध्यक्षा भक्ती कुंभार.

“राज्याचे पोलीस दल भाजपने विकत घेतले, आजच्या हल्ल्याला तेच जबाबदार” : वागळेंचे गंभीर आरोप

भाजपचे आक्रमक कार्यकर्ते अन् काही गुंड वागळे, चौधरी आणि सरोदे ज्या गाडीत बसले होते त्या गाडीवर अक्षरशः तुटून पडले होते. दगड फेक करत होते, काठ्या, हॅाकी स्टिक्स, रॅाड्सने गाडी फोडत होते, काचा फोडत होते, या तिघांच्या अंगावर अंडी टाकण्याचा, शाईफेक करण्याचा प्रयत्न झाला. अवघ्या अर्ध्या तासात चार वेळा पाठलाग करुन त्यांना घेरण्यात आले. पण भक्ती कुंभार यांनी धाडसाने पुढे होऊन गाडीला संरक्षण दिले, हल्ला करणाऱ्यांना त्या बाजूला करत होत्या, छातीचा कोट करुन त्या वागळेंना वाचविण्याचा आणि त्यांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत होत्या.

निखील वागळे, विश्वंभर चौधरी आणि अनेक कार्यकर्त्यांनीही त्यांच्या फेसबुक पोस्टमधून भक्ती कुंभार यांच्या धाडसाचे कौतुक केले आहे. वागळे म्हणाले, मला इजा होऊ नये म्हणून काचांचे तुकडे रुतले तरी मागे न हटणारा असीम सरोदे.,जीवाची बाजी लावून आमची गाडी हाकणारा आमचा सारथी वैभव, पुढच्या सीटवर बसून हल्ला अंगावर घेणारी ॲड श्रीया, शेवटपर्यंत साथ देणारे विश्वंभर, रस्त्यावर उतरुन हल्लेखोरांशी दोन हात करणारा बंटी, भक्ती कुंभार आणि असंख्य कार्यकर्ते यांचं ऋण मी कसे फेडू? भाजपच्या कार्यकर्त्यांशी दोन हात करणारे राहुल डंबाले, प्रशांतदादा जगताप यांची कुमक..कॅांग्रेसचे अरविंद शिंदे, वंचित आणि आपचे कार्यकर्ते, धोका पत्करुन मला मुंबईत पोहोचवणारा नितीन वैद्य..कुणाकुणाची नावं घेऊ? सगळ्यांचा मी ऋणी आहे.

पुण्यात भाजप कार्यकर्त्यांची अरेरावी : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंवर हल्ला, गाडी फोडली, अंडी फेकली

भक्ती कुंभार यांच्या धाडसाचा थरार सांगताना विश्वंभर चौधरी म्हणाले, भाजपच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला दांडेकर पुलाच्या सिग्नलला शेवटचे गाठले. तिथे राष्ट्रवादीच्या भक्ती कुंभार नावाच्या रणरागिणीने त्यांना अडवायचा प्रयत्न केला. त्यात त्या आणि त्यांचा तीन चार महिला साथी जखमी झाल्या. भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांनाही मारले. इतके निर्ढावलेले कार्यकर्ते सत्ताधारी पक्षात आहेत ही शरमेची गोष्ट आहे. मोठमोठे दगड मारल्यामुळे गाडीच्या मागच्या काचेचा चक्काचूर झाला होता. तिथून ते रॉड आत टाकण्याचा प्रयत्न करत होते. असीमने वागळे सरांचे डोकं खाली धरून ठेवले आणि आम्ही तिघंही डोकं खाली करून लागणार नाही असे बसलो होतो. अशा या जीवघेण्या हल्ल्यानंतर वागळे, चौधरी आणि सरोदे सभास्थळी पोहचले आणि प्रचंड गर्दीत सभा पार पडली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube