काल सरकारचे ‘बाळराजे’ कोठे होते? सुलतानपूर रिसॉर्ट अन् साग्रसंगीत कार्यक्रमावरुन राऊतांची टीका

काल सरकारचे ‘बाळराजे’ कोठे होते? सुलतानपूर रिसॉर्ट अन् साग्रसंगीत कार्यक्रमावरुन राऊतांची टीका

मुंबई : काल सरकारचे बाळराजे कोठे होते? त्यांच्या खास गँग बरोबर सुलतानपूर रिसॉर्ट मध्ये साग्र संगीत बरेच काही करीत होते.. या राज्याचे कठीण आहे, असे म्हणत शिवसेना (UBT) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. याच ट्विटमध्ये राऊत यांनी पुण्यातील नामचीन गुंड जितेंद्र जंगम (Jitendra Jangam) याचा शिवसेनेत प्रवेश करतानाचा फोटोही ट्विट केला आहे. (Sanjay Raut criticized Chief Minister Eknath Shinde and his son MP Shrikant Shinde through Twitter)

दोन्ही बाजूंनी प्रतिज्ञापत्र देणारे 5 आमदार अन् CM शिंदेंच्या मंत्र्याचा दावा; नेमकं ‘पॉलिटिक्स’ काय?

संजय राऊत या ट्विटमध्ये म्हटले आहेत की, पुण्याचे नवे पोलीस आयुक्त महोदयांनी काल म्हणे गुंडांची परेड घेऊन इशारा दिला. राजकारण्यांच्या आसपास फिरकायचे नाही वैगरे..छान! काही गुंड टोळ्या आणि त्यांचे प्रमुख मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत थेट मींधे गँग मध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांची परेड काढणार काय? हातात भगवा घेतलेले हे महात्मा कोण आहेत? हा पुण्यातला गुन्हेगार आहे. याच्यावर खुन ,खुनाचा प्रयत्न, चोरी, अपहरण असे गुन्हे आहेत व मोका मधुन नुकताच बाहेर आला आहे. महाराष्ट्रात गुंडांनी गुंडासाठी चालविलेले राज्य! (काल सरकारचे बाळराजे कोठे होते?त्यांच्या खास गँग बरोबर सुलतानपूर रिसॉर्ट मध्ये साग्र संगीत बरेच काही करीत होते..या राज्याचे कठीण आहे.) असे राऊत म्हणाले.

राजकीय नेत्यांची अन् गुंडांची भेट :

गत काही दिवसांपासून राजकीय नेते आणि गुंडांचे संबंध हा राज्यातील चर्चेचा विषय ठरला आहे. आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी गुंड मारणेची त्याच्या घरी जाऊन भेट घेतली. या भेटीवरुन पार्थ पवारांवर त्यांच्याच पक्षातून टीका झाली. स्वतः अजित पवार यांनी देखील ही भेट चुकीची असल्याचे म्हटले. अशातच उल्हासनगरमधील भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला. त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली.

Lok Sabha 2024 : ‘यूपी’त ‘इंडिया’ला धक्का, मोठा नेता साथ सोडणार?; शिवपाल यादवांनी स्पष्टच सांगितलं

याच घटनेनंतर विरोधकांकडून सरकार गुंडांना राजाश्रय देत असल्याचा आरोप करण्यास सुरुवात केली आहे. अशात संजय राऊत यांनी पुण्यातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची वाढदिवसादिनी भेट घेतल्याचा फोटो ट्विट केला. त्यानंतर लगेच कारवाईचे पाऊल उचलत ही भेट घडवून आणणाऱ्या अनिकेत जावळकरची युवा सेनेतून हकालपट्टी केली.

त्यानंतर राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुण्यातीलच दुसरा कुख्यात टोळी प्रमुख निलेश घायवळ याने भेट घेतल्याचा फोटो ट्विट केला होता. यातून त्यांनी पुण्यातल्या गुन्हेगारांना राजकीय वरदहस्त शिंदे पिता-पुत्राकडून मिळतो का?, असा सवाल करत घणाघात केला होता. त्यानंतर आता जिंतेंद्र जंगम हा नामचीन गुंड एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केल्याचा फोटो संजय राऊत यांनी ट्विट केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज