हायब्रीड स्पर्धा भरवा नाहीतर बाहेर पडा; आयसीसीचा पाकिस्तानला थेट इशारा
आयसीसीने पाकिस्तानला सांगितलं आहे की एकतर हायब्रीड मॉडेल पद्धतीने स्पर्धेचं आयोजन करा नाहीतर स्पर्धेतून बाहेर पडा.

Champions Trophy in Pakistan : पुढील वर्षात पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा होणार आहे. मात्र या स्पर्धेचं वेळापत्रक आणि ठिकाणांवर अजूनही सस्पेन्स कायम आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे भारत सरकारने टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही असं स्पष्ट सांगितलं आहे. बीसीसीआयने या आधीच आयसीसीला याची माहिती दिली होती. आता आयसीसीकडून ही स्पर्धा हायब्रीड मॉडेल अंतर्गत आयोजित करण्याचा विचार सुरू झाला आहे. या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आजच आयसीसीची मोठी बैठक होणार आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मात्र हायब्रीड मॉडेल स्वीकारणार नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आयसीसीने आक्रमक होत पाकिस्तान बोर्डाला थेट अल्टिमेटम दिला आहे. पीसीबी अध्यक्ष मोहसीन नकवी यांनी या बैठकीत भाग घेतला होता. ही बैठक दुबईत झाली. याच बैठकीत आयसीसीने पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे की एकतर हायब्रीड मॉडेल पद्धतीने स्पर्धेचं आयोजन करा नाहीतर स्पर्धेतून बाहेर पडण्यासाठी तयार राहा.
Champions Trophy : भारताने नकार देताच पाकिस्तानचा नवा फॉर्म्यूला; BCCI मंजूर करणार?
भारताने नकार दिल्यानंतर आता पाकिस्तानकडे हायब्रीड मॉडेलशिवाय दुसरा पर्याय नाही. जर स्पर्धा स्थगित झाल्या तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला 60 लाख डॉलर्स म्हणजेच 50.73 कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या अडचणी वाढण्याची सर्वाधिक शक्यता आहे. त्यामुळे आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यावर काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार स्पर्धा आयोजित करण्याच्या उद्देशाने पाकिस्तान यात काही बदल करण्याची शक्यता आहे. साखळी फेरीतील तीन सामन्यांपैकी एक तरी सामना भारतीय संघाने पाकिस्तानात खेळावा अशी बोर्डाची इच्छा आहे. उर्वरित सामने अन्य देशांत खेळवण्याची बोर्डाची तयारी असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातील स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले होते.
जर भारतीय संघ सेमी फायनलमध्ये पोहोचला तर हा सामना देखील दुसऱ्या देशात होईल. पण जर टीम इंडियाने फायनल सामन्यात प्रवेश मिळवला तर हा सामना पाकिस्तानातच होईल असे बोर्डाला वाटत आहे. हा सामना लाहोरमध्ये होईल. अशात टीम इंडिया (Team India) स्पर्धेतील बाकीचे सामने युएई किंवा श्रीलंकेत खेळण्याची शक्यता आहे.
मोठी बातमी : चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही, परराष्ट्र मंत्रालयाचा निर्णय