मोठी बातमी : इस्त्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाचा म्होरक्या ठार; इस्त्रायली सैन्यानं केलं कन्फर्म!
Israel Lebanon Conflict : इस्त्रायलने हिजबुल्ला संघटनेचा प्रमुख हसन नरसल्लाह मारला गेल्याचा (Israel Lebanon Conflict) मोठा दावा केला आहे. इस्त्रायल डिफेन्स फोर्सने (IDF) आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरील पोस्टमध्ये या घटनेची माहिती दिली आहे. हमासनंतर हिजबुल्लाचा खात्मा करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इस्त्रायलला हे मोठं यश मिळाल्याचं मानलं जात आहे. इस्त्रायली सैन्य दलाचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी सांगितलं की आम्ही दहशतवादी संघटना हिजबुल्लाचा नेता हसन नसरल्लाह आणि दक्षिणी आघाडीचा कमांडर अली कारची यांच्यासह अन्य कमांडर्सना ठार मारलं आहे.
तिसऱ्या महायुद्धाचा धोका! लेबनॉनवर इस्त्रायल करणार मोठा हल्ला? आदेश नेमका काय..
आमच्या गुप्तचर यंत्रणांना अचूक माहिती मिळाली होती. यानंतर हवाई दलाचे लढाऊ विमानांनी हिजबुल्लाच्या मुख्य ठिकाणांवर हल्ले केले. यातील एक हल्ला बेरूतमधील दाहियेह क्षेत्रातील एक इमारतीत तळघरात करण्यात आला. हा हल्ला नेमका अशावेळी झाला जेव्हा या संघटनेचे प्रमुख नेते इस्त्रायली नागरिकांवर हल्ला करण्याच्या रणनीतीवर काम करत होते.
नसरल्लाहच्या 32 वर्षांच्या कार्यकाळात त्याने अनेक निष्पाप इस्त्रायली नागरिक आणि सैनिकांची हत्या आणि अनेक दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी तो जबाबदार होता. जगभरात दहशतवादी करण्यातही त्याचा हात होता. या दहशतवादी हल्ल्यांत अनेक देशांतील निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला होता. हिजबुल्ला संघटनेत नसरल्लाह सर्व महत्वाचे निर्णय घेत होता आणि रणनीतीही ठरवत होता अशी माहिती इस्त्रायली सैन्याचे प्रवक्ते डॅनियल यांनी सांगितले.
हिजबुल्लाने पॅलेस्टाइनमधील दहशतवादी संघटना हमास बरोबर 8 ऑक्टोबर 2023 पासून इस्त्रायल विरुद्ध युद्ध पुकारले होते. युद्धाच्या सुरुवातीपासूनच इस्त्रायली नागरिकांना टार्गेट केले जात होते. यामुळे लेबनॉन आणि या पूर्ण प्रदेशात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. आयडीएफ चीफ लेफ्टनंट जनरल हर्जी हलेवी यांनी सांगितले की ही घटना टूलबॉक्समधील टूलचा शेवट नक्कीच नाही. आमचा संदेश एकदम स्पष्ट आहे की जो कुणी इस्त्रायलच्या नागरिकांना धमकावण्याचा प्रयत्न करेल त्यांना कुठे पाठवायचं हे आम्हाला माहिती आहे.
मोठी बातमी! लेबनॉनवर इस्रायलचा मोठा हवाई हल्ला, 100 जणांचा मृत्यू
दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी दोन्ही देशांनी शांतता राखावी असे आवाहन काही दिवसांपूर्वी केले होते. जर युद्ध सुरू झाले तर संपूर्ण पश्चिम आशियात विनाश घडू शकतो असा इशारा ब्लिंकेन यांनी दिला. अमेरिकेने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतही या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली. या दोन्ही देशांदरम्यान युद्धविराम करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही दोन्ही देशांतील युद्ध या प्रदेशाच्या विनाशास कारणीभूत ठरू शकतं असा इशारा दिला.