नाशकात तिरंगी, मुंबई-कोकणात मविआ-महायुती भिडणार; माघारीनंतर लढती स्पष्ट

नाशकात तिरंगी, मुंबई-कोकणात मविआ-महायुती भिडणार; माघारीनंतर लढती स्पष्ट

Vidhan Parishad Election 2024 : विधानपरिषदेच्या नाशिक शिक्षक, मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघातील (Vidhan Parishad Election 2024) लढती आज निश्चित झाल्या. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. या मुदतीत अनेक उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर या चार मतदारसंघातील निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. लोकसभा निवडणुकीनंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. लोकसभेत मिळालेल्या यशामुळे महाविकास आघाडीचा उत्साह वाढला आहे तर महायुतीसमोर स्वतःला सिद्ध करण्याचे आव्हान या निवडणुकीत असणार आहे. एकूणच राज्यातील दोन्ही आघाड्यांसाठी ही निवडणूक महत्वाची ठरणार आहे.

नाशिकमध्ये कोल्हेंच्या एन्ट्रीने लढत तिरंगी

नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीचं चित्र आज स्पष्ट झालं.  महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांना यश आलं. त्यांचे बंधू राजेंद्र विखे यांनी अखेर निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराच्या अडचणी कमी झाल्या आहेत. नगर जिल्ह्यातील उत्तरेच्या राजकारणात विखे विरुद्ध कोल्हे हा संघर्ष आपण आजवर पहिला आहे. आता पुन्हा एकदा हे दोन प्रतिस्पर्धी आमने सामने येणार होते.

नाशिक शिक्षक मतदारसंघ : विखे पाटलांची तलवार म्यान, विवेक कोल्हेंचा महायुतीविरोधातील अर्ज कायम

माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र विवेक कोल्हे यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर त्यांना शह देण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे यांचे बंधू डॉ. राजेंद्र विखे हे आता सरसावले होते. परंतु, त्यांनी माघार घेतल्याने ही संभाव्य लढत टळली आहे. तरीही या मतदारसंघात 21 उमेदवार रिंगणात असून महाविकास आघाडीचे संदीप गुळवे, महायुतीचे किशोर दराडे आणि अपक्ष विवेक कोल्हे यांच्यातच तिरंगी लढत होणार आहे.

कोकणात भाजप-काँग्रेस थेट लढत, ठाकरेंची माघार

कोकण मतदारसंघातही आज अनेक राजकीय घडामोडी घडल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीला मान देऊन मनसेने आधीच अभिजीत पानसे यांची उमेदवारी मागे घेतली होती. त्यानंतर आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही संजय मोरे यांचा अर्ज मागे घेतला. या दोन माघारीमुळे भाजपाच्या अडचणी कमी झाल्या आहेत. अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर या मतदारसंघात भाजपाचे निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे रमेश कीर यांच्यात थेट लढत होणार आहे. याआधी ठाकरे गटाने या मतदारसंघात उमेदवार दिला होता. निवडणूक लढण्याचाही ठाकरेंचा इरादा होता. मात्र नेत्यांच्या पडद्यामागील घडामोडी यशस्वी झाल्या आणि शेवटच्या क्षणी ठाकरे गटाचे किशोर जैन यांनी माघार घेत काँग्रेसच्या रमेश कीर यांना पाठिंबा जाहीर केला.

जिथे शरद पवार गटाचा मेळावा त्याच नगरमधून तटकरेंचा दौरा; नव्या राजकारणाचं गणित काय?

मुंबई शिक्षक मतदारसंघात चौरंगी लढत

मुंबई शिक्षक मतदारसंघात अजित पवार गटाचे नलावडे, ठाकरे गटाचे ज. मो. अभ्यंकर, शिक्षक भारती संघटनेचे सुभाष मोरे आणि भाजप पुरस्कृत शिवनाथ दराडे हे सध्याच्या घडीचे उमेदवार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे. शिंदे गटाचा उमेदवार असताना येथे भाजप पुरस्कृत म्हणून शिवनाथ दराडे यांनीही उमेदवारी कायम ठेवली आहे.

मुंबई पदवीधरमध्येही ठाकरे गट अन् भाजप भिडणार

मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही तगडी आहे. कारण इथे ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार किरण शेलार यांच्यात थेट लढत होणार आहे. या मतदारसंघात आधी शिंदे गटाचे नेते आणि माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनीही अर्ज दाखल केला होता. त्यामुळे भाजपात अस्वस्थता वाढली होती. सावंत अर्ज मागे घेतील की नाही याबाबत शाश्वती नव्हती. आज मात्र त्यांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपला दिलासा मिळाला आहे. या मतदारसंघात आता माजी परिवहन मंत्री आणि ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब आणि भाजपाचे किरण शेलार यांच्यात थेट लढत होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज