नरभक्षक बिबट्याला ठार मारा; घटनास्थळावरून आमदार आशुतोष काळेंची उपमुख्यमंत्री अजितदादांकडे मागणी
MLA Ashutosh Kale - नागरिकांची समजूत काढत परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून अजित पवार यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली.
कोपरगाव- मागील आठवड्यात टाकळी परिसरात ऊसतोडणी मजुराच्या चार वर्षाच्या चिमुकलीवर बिबट्याने केलेल्या हल्ला केला. यात चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला होता. ही घटना ताजी असतानाचा सोमवारी सकाळी शेतात गवत कापण्यासाठी गेलेल्या महिलेवर बिबट्याने (Leopard) हल्ला केला. यात 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय. या घटनेची माहिती समजताच आमदार आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale)काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरूनच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना भ्रमणध्वनीवरून घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती देवून माणसांच्या रक्ताची चटक लागलेल्या नरभक्षक बिबट्याला तातडीने ठार मारण्याच्या सूचना वनविभागाला दयाव्यात अशी मागणी केली.
(Kill the man-eating leopard; MLA Ashutosh Kale’s demand to Deputy Chief Minister Ajit Pawar)
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली; व्हेंटिलेटरवर असल्याची डॉक्टरांची माहिती
सोमवारी सकाळी अकरा वाजता येसगावमधील निकोले वस्ती या ठिकाणी शेतात गवत कापण्यासाठी गेलेल्या शांताबाई अहिल्याजी निकोले यांच्यावर गवतात लपून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच मदार आशुतोष काळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मृत महिलेच्या कुटुंबियाला व नागरिकांना आमदार आशुतोष काळे यांनी धीर देत घडलेल्या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. यावेळी नागरिकांनी मागील आठवड्यात चार वर्षांच्या चिमुकलीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात, त्या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला होता. वन विभागाने त्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी कारवाई न केल्यामुळे पुन्हा एका निरपराध महिलेला आपला जीव गमवावा लागला असल्याचे सांगत वनविभागाच्या विरोधात आपला रोष व्यक्त केला.
आमदार आशुतोष काळे यांनी नागरिकांची समजूत काढत परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घडलेल्या घटनेची भ्रमणध्वनीवरून सविस्तर माहिती दिली. दोन महिलांवर झालेल्या हल्ल्यात त्या महिलांनी आरडाओरड केल्यामुळे त्या महिलांचा जीव वाचला. परंतु एकामागोमाग एक बिबट्याच्या हल्ल्यात सातच दिवसाच्या अंतराने दोन निरपराध जीव गेले आहेत. नागरिकांनी रस्ता-रोको करून कोपरगाव-मनमाड मार्ग बंद पाडला आहे. त्यामुळे पाच किलोमीटरपर्यंत रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण असून शेतात काम करण्यासाठी जाण्यास नागरिक धजावत नाही.त्यामुळे माणसांच्या रक्ताची चटक लागलेल्या नरभक्षक बिबट्याला तातडीने ठार मारण्यासाठी वन विभागाने प्रस्ताव पाठविला आहे. त्याबाबत आपण जातीने लक्ष घालावे व वन विभागाला योग्य त्या सूचना द्यावी, अशी मागणी केली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार आशुतोष काळे यांना दिलेली माहिती त्यांनी उपस्थित नागरिकांना स्पीकर फोनवरून ऐकविली.
यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले की, आमदार आशुतोष काळे यांनी मला सविस्तर माहिती दिली आहे. मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. त्या जिल्ह्यातही अशाच प्रकारे बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना सुरु आहे. त्या हल्ल्यात लहान मुलांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून बिबट्यांना पकडण्यासाठी व नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागितलेल्या परवानगी तसेच बिबटे येवू नये यासाठी ज्या काही उपाय योजना करता येवू शकतात जेणेकरून नागरीक सुरक्षित राहतील यासाठी ज्या प्रमाणे पुणे जिल्ह्यात उपाययोजना केल्या आहेत त्या धर्तीवर उपाय योजना करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रस्ताव मंजूर होताच बिबट्याला ठार मारण्याची कार्यवाही-जिल्हाधिकारी
आमदार आशुतोष काळेंच्या मागणीची गांभीर्याने दखल घेवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून बिबट्यांना पकडण्यासाठी करव्याच्या आवश्यक उपाययोजना व नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याबाबत तातडीने निर्णय घेण्याचे सांगितले. त्यानुसार सदरच्या सूचनांची अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी प्रशासनाला कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बिबट्यांचा प्रतिबंध करण्यासाठी ज्या साहित्याची वनविभागाने मागणी केली आहे. त्याला पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली मान्यता दिली आहे. येसगाव-टाकळी परीसरातील नरभक्षक बिबट्याला ठार करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. शासनाकडून तो प्रस्ताव मंजूर होताच त्यावर कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी दिली आहे.
कापूस वेचणाऱ्या महिलेवर बिबट्याचा हल्ला
येसगाव टाकळीप्रमाणे सुरेगाव येथील साहेबराव वाबळे यांच्या शेतात कापूस वेचत असताना चाळीस झोपडी येथील माया सोनवणे या महिलेवर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये त्या थोडक्यात वाचल्या आहेत. तसेच कोळगाव थडी व कोळगाव थडी-कोळपेवाडी रोडवर, माहेगाव देशमुख काळे वस्ती, रवंदे-येवला रोड, वेळापूर ताम्हाणे वस्ती मतदार संघात अशा अनेक ठिकाणी नागरिकांना बिबट्याने दर्शन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी पिंजरे लावण्याच्या सूचना आमदार आशुतोष काळे यांनी वन विभागाला दिल्या आहेत.
