Video : ..तर राजकीयचं उत्तर मिळेल; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फडणवीसांचा विरोधकांना इशारा
Maharashtra Winter Session : राज्यातील महायुती सरकारच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनाचा आज पहिलाच दिवस. पहिल्याच दिवशी विरोधकांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. यानंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांत खडाजंगी उडाल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्ट शब्दांत विरोधकांना इशारा दिला. फडणवीस यांनी आज विधीमंडळा बाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला.
तुम्ही काल विरोधकांना आवाहन केलं होतं की माध्यमांसमोर चर्चा न करता विधीमंडळात येऊन चर्चा करा. यावर अंबादास दानवेंनी खुलं आव्हान दिलंय की चर्चा करणार असाल पण खोटं बोलू नका, असे पत्रकारांनी विचारले असता फडणवीस म्हणाले, अंबादास दानवे असतील किंवा विरोधी पक्षांचे अन्य सदस्य असतील माझं त्यांना आव्हान आहे की त्यांनी पाहिजे ती चर्चा करावी. आमचं सरकार उत्तर द्यायला सक्षम आहे. सरकार कोणतीही बाजू लपवून ठेवणार नाही. कुठेही मागेपुढे पाहणार नाही. पण विरोधकांनी केवळ राजकारण करायचं ठरवलं तर मग त्यांना राजकीयच उत्तर मिळेल.
🕑 1.56pm | 16-12-2024 📍 Vidhan Bhavan, Nagpur
LIVE | Media interaction#Maharashtra #Nagpur #WinterSession2024 https://t.co/PEVxZeOxD3
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 16, 2024
अधिवेशनात ३५ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत. त्या लवकरच मंजूर होतील. आपला अर्थसंकल्प सहा लाख कोटींपेक्षा मोठा आहे. ज्यावेळी आपला अर्थसंकल्प दोन ते अडीच लाख कोटींचा होता त्यावेळी देखील आपण पंधरा हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडत होतो. जेव्हापासून आपण नवीन अकाउंटिंग सिस्टिम सुरू केली आहे तेव्हापासून पुरवणी मागण्यांची संख्या वाढली आहे.
सुधीर मुनगंटीवार विधीमंडळाच्या कामकाजात सहभागी होणार नाहीत अशी चर्चा सुरू आहे. याबाबत तुमचं त्यांच्याशी काही बोलणं झालंय का असे विचारल्यावर फडणवीस म्हणाले, माझी सुधीर भाऊंशी चर्चा झाली आहे. ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत. काही नेत्यांना मंत्रिमंडळात घेतले नाही तर त्यांच्यासाठी काही विशिष्ट जबाबदारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतलेला आहे.
जहाँ नही चैना वहाँ नहीं… 8 दिवसांपूर्वीच्या मोठ्या ऑफरचा उल्लेख करत भुजबळांचे बंडाचे संकेत?
सरकार आणि पक्ष दोन्ही आपल्याला चालवावे लागतात. तेव्हा सरकारमध्ये काम करणारे पक्षात काम करतात आणि पक्षात काम करणारे सरकारमध्ये काम करत असतात. सुधीर भाऊ अतिशय अनुभवी नेते आहेत. राज्याचे आमचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यामुळे आमच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्या बाबतीत काहीतरी विचार करूनच त्यांना मंत्रिमंडळात घेतलेलं नाही असे फडणवीस म्हणाले.
काँग्रेसवर टीका करताना फडणवीस म्हणाले, पहिल्यांदा तर ओबीसींबद्दल बोलण्याचा काँग्रेसा काहीच अधिकार नाही. कारण काँग्रेसच्या उभ्या आयुष्यात त्यांनी ओबीसींवर अन्याय करण्यापलीकडे काहीच केलं नाही. महाराष्ट्रातलं ओबीसी मंत्रालय मी मुख्यमंत्री असताना स्थापन झालं होतं.
ओबीसी समाजाकरता जवळपास ४८ जीआर आमच्या सरकारने काढले होते. सगळी कामं आम्ही केली आहे. काँग्रेसकडे दाखवण्यासारखं एकही काम नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षात विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्यावर जो अन्याय होतो आहे त्याबद्दलचा राग त्यांनी आमच्यावर काढू नये.