विरोधक षडयंत्र रचतील, दिशाभूलही करतील, त्यांचा डाव हाणून पांडा; यशोमती ठाकूर यांचे आवाहन
अमरावती : निवडून येण्यासाठी जनतेची कामे करावी लागतात. जनतेचा विश्वास संपादन करणे ही सहज, सोपी गोष्ट नाही. परंतु, या निवडणुकीत विरोधक षडयंत्र करून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील. प्रसंगी भूलथापादेखील मारतील. पण, त्यांचा हा डाव हाणून पाडा, सत्याची साथ द्या, असे आवाहन यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी प्रचार सभेत उपस्थित नागरिकांना केले.
‘माझ्या विरोधात भाजप उमेदवार कॉन्ट्रॅक्टर’, यशोमती ठाकूर यांचा दावा, नवनीत राणांचाही घेतला समाचार
तिवसा मतदारसंघातील विविध गावांत प्रचार दौरा काढून महाविकास आघाडीच्या उमेदवार ठाकूर नागरिकांशी संवाद साधत आहेत. गुरुवारी मोर्शी तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन यशोमती ठाकूर यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात आली. यावेळी कॉर्नर मीटिंग घेऊन प्रचार करण्यात आला.
विरोधक आपली बदनामी करून विविध षडयंत्र रचत असल्याची माहिती गावकऱ्यांनी यशोमती ठाकूर यांना दिली. यावर प्रत्युत्तर देताना यशोमती ठाकूर यांनी सांगितले की, कोणत्याही आमिषाला आपण बळी पडू नये, विरोधकांना त्यांची जागा दाखवून देण्याची हीच योग्य वेळ आहे. खोटी आश्वासने देऊन ते जनतेची दिशाभूल करीत आहेत. मात्र, या मतदारसंघातील विकास हीच माझ्या कार्याची पावती असल्याचे यशोमती ठाकूर यांनी मतदारांना सांगितले.
यशोमती ठाकूर यांचे हात बळकट! बहुजन महापार्टीच्या हर्षवर्धन खोब्रागडेंनी दिला बिनशर्त पाठिंबा
यावेळी विविध गावांतील नागरिकांनी यशोमती ठाकूर यांना उत्स्फूर्त समर्थन देत विक्रमी मताधिक्याने महाविकास आघाडीची जागा आपण कायम राखू, असा विश्वास दिला. आपण चौथ्यांदा या मतदारसंघातून विजयी व्हाल, अशा शुभेच्छा गावकऱ्यांनी दिल्या.
पदयात्रेत प्रत्येक गावातील नागरिकांची लक्षणीय उपस्थिती चर्चेचा विषय ठरत आहे. जनतेचे प्रेम आणि विश्वास यामुळेच प्रत्येक गावातील मतदारांचा आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे यशोमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले. विविध गावांतील मंदिरे व समाज मंदिरांना भेटी देत त्यांनी महापुरुषांना वंदन केले. त्यानंतर गावकऱ्यांशी संवाद साधला. पदयात्रेत फुलांचा वर्षाव करून प्रत्येक गावातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात प्रचार यात्रेचे स्वागत केले.
गुरुवारी गोराळा, तळेगाव, धामणगाव, शिरखेड, लिहिदा, लेहगाव, नेरपिंगळाई, शिरलस, कमळापूर, निंभारी, राजूरवाडी, कवठाळ, भांबोरा या गावांत पदयात्रा काढून यशोमती ठाकूर यांनी प्रचार केला.