ईडी राहुल गांधींवर कारवाई करणार? राहुल गांधी म्हणाले, “स्वागतासाठी मी तयार..”
Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी खळबळजनक दावा केला आहे. संसदेत चक्रव्यूहाचं भाषण केल्यानंतर ईडीकडून (ED Raid) माझ्याविरुद्ध कारवाईची तयारी केली जात आहे असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) भाषण करताना राहुल गांधींनी कमळ चिन्हाचा उल्लेख केला होता. एकविसाव्या शतकात नवीन चक्रव्यूह तयार केले जात आहे, असे त्यांनी सांगितले होते. या भाषणानंतर ईडीकडून कारवाईची तयारी केली जात असल्याचा आणखी एक दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
Apparently, 2 in 1 didn’t like my Chakravyuh speech. ED ‘insiders’ tell me a raid is being planned.
Waiting with open arms @dir_ed…..Chai and biscuits on me.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 1, 2024
या संदर्भात राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं आहे. स्पष्टच आहे की माझं चक्रव्यूहाचं भाषण त्यांना आवडलेलं नाही. ईडीच्या अंतर्गत सूत्रांनी मला सांगितलं आहे की एक प्लॅन तयार केला जात आहे. मोकळ्या मनाने मी स्वागत करत आहे. चहा आणि बिस्कीट माझ्याकडून.. असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. राहुल गांधी केरळमधील वायनाड येथे भूस्खलन होऊन झालेल्या दुर्घटनेतील संकटग्रस्तांचे सांत्वन करण्यासाठी गेले होते.
राहुल गांधींच्या भाषणात काय
राहुल गांधी संसदेत म्हणाले होते की हजारो वर्षांपूर्वी कुरुक्षेत्रात सहा लोकांनी अभिमन्यूला चक्रव्युहात अडकवलं होतं आणि त्याला मारलं. मी थोडा अभ्यास केला आणि कळलं की या चक्रव्युहाला पद्मव्यूह असे म्हणतात. याचा अर्थ कमळ चिन्हासारखं आणि त्याच आकारातलं निर्माण. प्रधानमंत्री या कमळाच्या चिन्हाला छातीवर लावून फिरतात.
जे अभिमन्यूबरोबर झालं आता तेच भारताबरोबर केल जात आहे. युवक, शेतकरी, महिला, लहान आणि मध्यम व्यवसायी यांच्याबाबतीतही आज तेच घडत आहे. अभिमन्यूला सहा लोकांनी मारलं होतं. आज चक्रव्युहाच्या केंद्रात सहा लोक आहेत. आज सहा लोकच भारताला नियंत्रित करत आहेत. यानंतर राहुल गांधींनी पीएम नरेंद्र मोदी, अमित शाह, मोहन भागवत, अजित डोवाल, अंबानी आणि अदानींची नावं घेतली.
भाजपाचा तिखट पलटवार
त्यांच्या या भाषणावर सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांनीही तिखट पलटवार केला. अनुराग ठाकूर (Anurag Thakur) म्हणाले काही लोक अॅक्सिडेंटल हिंदू आहेत आणि त्यांचं महाभारताचं ज्ञानही अॅक्सिडेंटलच आहे. पहिलं चक्रव्यूह तर काँग्रेस (Congress Party) स्वतःच एक चक्रव्यूह आहे. ज्यांनी या देशाला विभाजित करण्याचं काम केलं.