काँग्रेसमधून सुरुवात अन् सासऱ्यांविरुद्ध बंड; NDA ला ‘टेकू’ देणाऱ्या नायडूंचं पॉलिटिक्सही धक्क्याचं..

काँग्रेसमधून सुरुवात अन् सासऱ्यांविरुद्ध बंड; NDA ला ‘टेकू’ देणाऱ्या नायडूंचं पॉलिटिक्सही धक्क्याचं..

Chandrababu Naidu : लोकसभा निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकीत भाजपाची मोठी पिछेहाट झाली. चारशे पारचा नारा दूरच राहिला साधं बहुमतही मिळवता आलं नाही. त्यामुळे दिल्लीतील सरकारच्या चाव्या आता टीडीपी प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हाती आल्या आहेत. या दोघांनी सरकारला तर पाठिंबा दिलाय मात्र अटी टाकल्या आहेत. चंद्राबाबूंचं वजन प्रचंड वाढलंय. हे तेच चंद्राबाबू आहेत ज्यांनी जगन मोहन रेड्डींच्या पक्षाचा धुव्वा उडवलाय. आता 12 जून रोजी नायडून चौथ्यांदा आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. त्यांचं आतापर्यंतचं राजकारण कसं राहिलं याचा थोडक्यात घेतलेला आढावा..

चौथ्यांदा होणार आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री

तेलुगू देसम पक्षाचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू 12 जून रोजी (Chandrababu Naidu) आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. नायडू चौथ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री बनतील. याआधी चंद्राबाबू यांनी 1 सप्टेंबर 1995, 11 ऑक्टोबर 1999 आणि 8 जून 2014 रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. आता शपथविधी अमरावतीमध्ये होईल. त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित राहतील.

तृणमूल इंडिया आघाडीला सत्तास्थापनेसाठी बाहेरून पाठिंबा देणार? शिष्टमंडळाने घेतली ठाकरेंची भेट

एन. चंद्रबाबू नायडू यांचं पूर्ण नाव नारा चंद्रबाबू नायडू आहे. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील नारावारीपल्ली गावात झाला. त्यांच्या वडिलांचं नाव खर्जुरा नायडू आणि आईचं नाव अमनम्मा आहे. नायडूंचं सुरुवातीचं शिक्षण तिरुपतीमध्ये झालं होते. पुढे त्यांनी चंद्रगिरी सरकारी शाळेतून दहावी आणि बारावीचं शिक्षण घेतलं. तिरुपती येथील श्री वेंकटेश्वर आर्ट्स कॉलेजमधून पदवीचं शिक्षण घेतलं. तसेच श्री वेंकटेश्वर विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण केलं.

काँग्रेसमधून सुरुवात अन् बनले टीडीपीचे नेते

नायडू यांनी काँग्रेस पक्षातून राजकारणाला सुरुवात केली. आणीबाणीनंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सन 1978 मध्ये नायडू यांनी पहिल्यांदा चंद्रगिरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. त्यानंतर 1980 मध्ये प्रसिद्ध अभिनेते आणि तेलुगू देसम पक्षाचे संस्थापक एन. टी. रामाराव यांची मुलगी नारा भुवनेश्वरी यांच्याबरोबर नायडू यांचा विवाह झाला. लग्नानंतरही नायडू काँग्रेमध्येच होते. यानंतर 1983 मधील विधानसभा निवडणुकीत तेलुगू देसम पक्षाच्या उमेदवाराकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. यानंतर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत टीडीपीत प्रवेश केला.

नायडू यांनी सन 1995 मध्ये आंध्रप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सासरे एन. टी. रामाराव यांच्या विरोधात बंड केले. नंतर विधासभेत बहुमत सिद्ध करुन स्वतः मुख्यमंत्री झाले होते. 2004 पर्यंत नायडू या पदावर होते. यानंतर अन्य कारणांमुळे त्यांना सत्ता वाचवता आली नाही. दहा वर्षानंतर 2014 मध्ये नायडू पुन्हा मुख्यमंत्री बनले. पाच वर्षे कारभार केल्यानंतर 2019 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीत जगन मोहन रेड्डी यांच्या पक्षाचा मोठा विजय झाला.

नव्याने सत्तेत येणार मोदी सरकार फार काळ टिकणार नाही; निर्मला सीतारामण यांच्या पतीचे मोठे विधान

आता चंद्राबाबू नायडू यांनी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा जगन मोहन रेड्डी यांचा दारुण पराभव केला आहे. लोकसभा निवडणुकीबरोबर राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीत भाजपच्या पाठिंब्याने तेलुगू देसम पक्षाने तब्बल 135 जागा जिंकल्या आहेत. आता नायडू चौथ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. याच नायडूंनी मागे एकदा आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत एनडीएला सोडचिठ्ठी दिली होती.

सासऱ्यांविरुद्ध बंडाचं कारण काय ?

सन 1994 मधील निवडणुकीत तेलुगू देसम पक्षाने बहुमत मिळवलं होतं. एनटीआर पुन्हा मुख्यमंत्री बनले आणि पक्षाचं नेतृत्व त्यांनी दुसरी पत्नी एन. लक्ष्मी पार्वती यांच्याकडे सोपवली. चंद्राबाबू नायडू यांच्यासह अन्य जावई त्यांच्या या निर्णयविरोधात होते. ज्यावेळी सर्वांनी या निर्णयाचा विरोध केला तेव्हा विरोध करणाऱ्या या सगळ्यांनाच पक्षाबाहेर जाण्यास सांगण्यात आले. यानंतर नायडू यांच्या नेतृत्वात पक्षाच्या आमदारांनी सत्तापालट केला. या घडामोडींनंतर एनटीआर यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर चंद्राबाबू नायडू आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झाले.

यानंतर केंद्रातील यूपीए सरकारच्या काळात आंध्र प्रदेशचे विभाजन करून तेलंगणा या नव्या राज्याची निर्मिती झाली. राज्याच्या राजधानीच हैदराबाद शहर तेलंगणात गेलं. तेव्हा अमरावती या शहराला आंध्रप्रदेशच्या राजधानीच्या रूपात विकसित करण्याचा निर्णय चंद्राबाबू यांनी घेतला होता. पण 2019 मध्ये त्यांची सत्ता गेल्याने त्यांना या निर्णयावर काम करता आलं नाही. आता नायडू यांचा शपथविधी सोहळा याच अमरावती शहरात होणार आहे. या सोहळ्यात अमरावती शहराला आंध्रप्रदेशची राजधानी म्हणून घोषित केले जाण्याची शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज