“चित्रा वाघांचा आकडा खूप कमी, भाजपमध्ये हिंमत असेल तर..”, सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

Sushma Andhare replies Chitra Wagh : सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन मृ्त्यू प्रकरणावरून (Disha Salian Case) काल विधिमंडळात मोठा गदारोळ उडाला होता. दिशा सालियनच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेतल्याने या प्रकरणाला पुन्हा वाचा फुटली. या याचिकेत त्यांनी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले.
या प्रकरणाचे तीव्र पडसाद काल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटले. विधानपरिषदेत तर भाजप आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचे रौद्ररुप पाहण्यास मिळाले. त्यांनी आमदार अनिल परब यांच्यावर (Anil Parab) घणाघाती टीका केली. मी तुमच्यासारखे ५६ पायाला बांधून फिरते. मी काय वशिल्याने आलेले नाही, असे वक्तव्य चित्रा वाघ यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी घणाघाती टीका केली. चित्रा वाघ यांनी जो आकडा काढला आहे तो त्यांचं कार्यकर्तुत्व पाहता खूप कमी आहे. आता भाजपमध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी संजय राठोड यांची फाईल पुन्हा ओपन करावी असे आव्हान सुषमा अंधारे यांनी दिले.
अनिल परब, ठाकरेंना विचारा राठोडांना का क्लीनचीट दिली? चित्रा वाघ संतापल्या, सभागृहात काय घडलं?
अंधारे पुढे म्हणाल्या, किंचाळणे हा बाईचा स्वभाव आहे. तिच्या स्वभावाला काही औषध नाही. वाघ बाई बद्दल बोलताना झोपडपट्टी बद्दल बोलू नये कारण झोपडपट्टीला सुद्धा क्लास असतो. भाजप आता बायकांच्या आडून नथीतून तीर मारण्याचा प्रयत्न करत आहे. वाघ बाई स्वतःच्या राजकीय करियरसाठी मृत तरुणीचं भांडवल करत होत्या. वाघ बाई यांनी काल सभागृहात जी भाषा वापरली त्यावर मी जाणार नाही कारण माझ्यावर संस्कार आहेत असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.
त्यांच्या नवऱ्याने एक लाख रुपये लाच मागितली याचा संताप होतो कारण त्यांच्यासाठी 1 लाख खूप कमी आहेत त्यात 2-3 कोटींची रक्कम असती तर जरा सुटेबल वाटले असते अशी खोचक टीका सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर केली. आता सुषमा अंधारे यांनी केलेल्या या टीकेवर चित्रा वाघ काय प्रत्युत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आदित्य ठाकरेंची दिल्लीत हुजरेगिरी, आजोबांचं तरी स्मरण ठेवा; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
दर्जेदार सभागृहाचे अवमूल्यन करण्याचं काम भाजप करत आहे. कालचा थयथयाट हा सभागृहाचा अपमान करणारा होता. सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलीस मारहाणीतच झाला यावर अजून कोणी काही बोललं नाही. सरकार बॅकफूटवर जातं असताना त्या सरकारला नवा मुद्दा हवा होता म्हणून त्यांनी आता औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा काढला अशी टीका सुषमा अंधारे यांनी राज्य सरकार आणि भाजपवर केली.