‘एकनाथ शिंदेंचं काम संपलं, लोकसभेला जर त्यांचा’.. प्रकाश आंबेडकरांनी नेमकं काय सांगितलं?
Prakash Ambedkar comment on Eknath Shinde : राज्यातील लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनेही उमेदवार दिले आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर प्रचारात (Prakash Ambedkar) उतरले आहेत. एका प्रचार सभेत त्यांनी राज्याचे मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत (Eknath Shinde) मोठा दावा केला आहे. हिंगोली येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. एकनाथ शिंदे यांचं काम आता संपलं आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
प्रचारसभेतील भाषणात प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली. नरेंद्र मोदी जर पुन्हा सत्तेत आले तर निवडणुकाच होणार नाहीत. जो ऐकणार नाही त्याला तुरुंगात डांबलं जाईल. मोदी सत्तेत आल तर सीएए आणि एनआरसी देशभरात लागू होतील. मोदी सत्तेत आल्यास ते घटना बदलल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे मोदींच्या विरोधात मतदान करा असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी उपस्थितांना केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मोठा दावा त्यांनी या भाषणात केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं काम आता संपलं आहे. लोकसभा निवडणुकीनंतर दोन महिन्यांनी ते तुम्हाला दिसणार नाहीत. लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा पाहिजे तसा फायदा दिसला नाही तर चित्र बदलू शकतं असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.
राहुल गांधींचा स्क्रिप्ट रायटर भाजपाचा
यानंतर मोंढा येथे आयोजित सभेत आंबेडकर म्हणाले, इलेक्ट्रोल बॉन्ड्स प्रकरणात काँग्रेसचे दुर्दैव आहे. सर्व कागदपत्रे आल्यानंतर काँग्रेस पंतप्रधान मोदींवर तुटून पडेल, असं वाटलं. मात्र, मात्र, काँग्रेस गप्प आहे. बिचाऱ्या राहुल गांधींचेही वाईट वाटते. बुद्धीमान असूनही त्यांना असिस्टंट लागतो. राहुल गांधींचा स्क्रिप्ट रायटर हा भाजपचा असल्याची मला शंका येते. कारण, 4000 किलोमीटर चालून आला अन् मुंबईच्या सभेत आमची लढाई मोदींशी नसून अदृश्य शक्तींशी असल्याचं म्हणाला. त्यांच्या एका वाक्याने सर्व कष्टावर पाणी फिरले, अशा शब्दांत आंबेडकरांनी टीका केली.