रवी राजांच्या एन्ट्रीनं भाजपला बळ, विधानसभा अन् मुंबई महापालिकेचं गणितही सेट?

रवी राजांच्या एन्ट्रीनं भाजपला बळ, विधानसभा अन् मुंबई महापालिकेचं गणितही सेट?

प्रशांत गोडसे, विशेष प्रतिनिधी

Ravi Raja Joins BJP : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबरला होत आहे. त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी तीन दिवस शिल्लक असतानाच ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला भाजपने मोठा धक्का दिला. मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद भूषवणारे रवी राजा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. रवी राजा यांच्यावर मुंबई प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. रवी राजा भाजपात आल्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्याचा फटका काँग्रेसच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या 44 वर्षांपासून रवी राजा काँग्रेस पक्षासोबत होते. त्यांनी मुंबई महापालिकेत पाच वेळा नगरसेवक आणि विरोधी पक्षनेतापद भूषविले आहे. विधानसभा निवडणुकीत ते सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातून इच्छुक होते. या मतदारसंघातून गणेश यादव यांना उमेदवारी मिळाल्याने रवी राजा नाराज होते. नाराजी त्यांनी उघडपणे जाहीर केली होती. गुरुवारी सकाळी रवी राजा यांनी काँग्रेस सदस्यपदाचा राजीनामा मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठवविला. नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. त्यांच्याबरोबर उपाध्यक्ष अभिषेक सावंत, ठाकरे गटाचे घाटकोपरचे विभागप्रमुख बाबू दरेकर यांचाही भाजपात प्रवेश झाला.

मुंबईतील तिकीट वाटपात गडबड : रवी राजा

भाजपात प्रवेश केल्यानंतर रवी राजा यांनी काँग्रेस पक्षावरआरोप केले. दिल्लीत वशीला असेल तर उमेदवारी मिळते तसेच मुंबईतील विधानसभा मतदारसंघात तिकीट वाटपात मोठ्या प्रमाणात धांदली असल्याचे स्पष्ट करत मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्यावर निशाणा साधला आहे.

ठरलं तर, मतदारसंघ अन् उमेदवार ‘या’ दिवशी जाहीर करणार; मनोज जरांगेंची घोषणा

आता जिथे आहात तिथेच राहा : वर्षा गायकवाड

काँग्रेसच्या खासदार आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनीही रवी राजा यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. दोन दिवसांपूर्वी आम्ही रवी राजा यांना भेटलो. आमचे प्रभारी सुद्धा भेटले. आमची चर्चा त्यांच्यासोबत झाली. एखादं तिकीट मिळालं नाही म्हणून नाराज होणं चुकीचं आहे. पक्षाशी एकनिष्ठ राहायला हवं. सत्ता मिळत नाही, तिकीट नाही मिळालं म्हणून दुसऱ्या पक्षात जाणं योग्य नाही. आज रवी राजा यांचा जो चेहरा बनला तो काँग्रेस पक्षामुळे बनला होता. पाचवेळा ते नगरसेवक राहिले आहेत. रवी राजा यांची नाराजी जगजाहीर आहे. त्यांना तिकीट मिळालं नाही म्हणून त्यांनी पक्ष बदलला आहे.

आता त्यांना भाजपमध्ये कुठले पद दिले त्याबद्दल मला माहिती नाही. रवी राजा आणि आमचा आता संबंध संपलाय. त्यांनी आता जिथे आहे तिथे राहावं. त्यांना काँग्रेस पक्षाने विरोधी पक्षनेतेपद दिलं. हे पद हे आमदाराच्या बरोबरीने होतं. मात्र, आता तुम्हाला आमदारकीचे तिकीट मिळत नाही म्हणून तुम्ही पक्ष सोडून जाता. त्यांचे काही मागचे प्रकरणं सुद्धा याला कारणीभूत होते. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

भाजपाचं मिशन महापालिका?

सायन कोळीवाडा मतदारसंघात गेल्या विधानसभा निवडणुकीत रवी राजा यांना तिकीट नाकारले होते. मात्र यावेळी तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु तिकीट काही मिळालं नाही. मुंबई शहरात त्यांची ओळख काँग्रेस पक्षाचा चेहरा म्हणून निर्माण झाली होती. कार्यकर्त्यांशी दांडगा संपर्क आहे. सायन कोळीवाडा मतदारसंघात महायुतीला त्यांचा फायदा होणार आहे. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार हे 23 तारखेला निश्चित होणार आहे.

मावळात सुनील शेळकेंचे हात बळकट, शिवसेना खासदाराचा जाहीर पाठिंबा…

रवी राजा यांना भाजपात प्रवेश देऊन मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाने टायमिंग साधले असल्याचे बोलले जात आहे. महापालिकेच्या निवडणुक डिसेंबर महिन्यात होतील असे सांगितले जात आहे. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा अर्थात महायुतीचं मिशन महापालिका असणार आहे. त्या अनुषंगाने भाजपा पुढील पाऊल टाकण्यास सुरुवात केली असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई महापालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना पक्षाची (उद्धव ठाकरे) एकहाती सत्ता राहिली आहे. सत्ता पुन्हा मिळविण्यासाठी शिंदे शिवसेना प्रयत्न करणार तर मुंबई महापालिकेत भाजपाचा महापौर बसावा आशा प्रकारचे स्वप्न भाजपा उरी बाळगून असल्याने ते पूर्ण होईल का हे पहाणे महत्वाचे असणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube