तुम्ही घरालगतचा परिसर सुरक्षित ठेवू शकत नाही, देश काय सुरक्षित ठेवणार?, केजरीवालांचा गृहमंत्र्यांना सवाल…

  • Written By: Published:
तुम्ही घरालगतचा परिसर सुरक्षित ठेवू शकत नाही, देश काय सुरक्षित ठेवणार?, केजरीवालांचा गृहमंत्र्यांना सवाल…

Arvind Kejriwal : आप नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पत्रकार परिषद घेऊन दिल्लीतील वाढत्या गुन्हेगारीवरून केंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. दिल्ली (Delhi) जगातील सर्वात असुरक्षित राजधानी आहे. जर अमित शाह आपल्या घरालगतचा परिसर सुरक्षित ठेवू शकत नसतील तर ते देश कसा सुरक्षित ठेवणार? असा थेट सवाल केजरीवाल यांनी केला.

रेश्माच्या हातावर सजली मेहंदी, फोटो एकदा पाहाच! 

गुन्हेगारी रोखण्यात गृहमंत्री अपयशी…
पत्रकार परिषदेत केजरीवाल म्हणाले की, दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. दरोडा, टोळीयुद्ध, खंडणी, बलात्कार यांसारख्या घटना ही दिल्लीची ओळख बनली आहे. दिल्लीतील जनतेने 10 वर्षांपूर्वी आम्हाला शाळा, रुग्णालये आणि इतर व्यवस्था सुधारण्याची जबाबदारी दिली होती. आम्ही जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जनतेने कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर दिली होती, पण ती पूर्ण करण्यात ते अपयशी ठरत आहेत, अशी टीका केजरीवाल यांनी केला.

तर ते देश कसा सांभाळणार?
पुढं केजरीवाल म्हणाले की, भाजपच्या लोकांनी दिल्लीला गुन्हेगारीची राजधानी बनवले आहे. येथे कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. व्यापारी आणि महिलांवरील गुन्हे वाढत आहेत. लोक भीती आणि दहशतीमध्ये जगत आहेत. दिल्लीत सर्वत्र रक्तपात सुरू आहे. इथं गुन्हेगारी शिगेला पोहोचली आहे, गोळ्या झाडल्या जात आहेत, खून होत आहेत. मात्र. गृहमंत्री शाह याला आळा घालू शकत नाहीत. गृहमंत्री हे त्यांच्या घराच्या 20 किलोमीटरच्या परिघातही गुन्हेगारी रोखू शकत नसतील, तर ते देश कसा हाताळणार?, असा सवाल केजरीवाल यांनी केला.

दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी
पुढं ते म्हणाले, आज दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी बनली आहे. दिल्ली ही जगाची बलात्काराची राजधानी झाली आहे, असे लोक म्हणत आहेत. काही जण ते जगाची गुंडांची राजधानी असल्याचे सांगत आहेत. हे ऐकून बरे वाटत नाही. गेल्या वर्षी 160 खंडणी कॉल्सची नोंद झाली आहे. खंडणीचे कॉल येतात आणि नंतर काही दिवसांनी कोणीतरी मोटरसायकलवर येतो आणि गोळीबार करतो. दिल्लीत हे इतके सामान्य झाले आहे की, व्यापारी दिल्ली सोडून शेजारच्या राज्यात जात आहेत. आज दिल्लीत व्यवसाय करणे हा गुन्हा ठरत आहे, असं केजरीवाल म्हणाले.

केजरीवालला रोखू नका, गुन्हेगारी रोखा...

केजरीवाल म्हणाले की, आज दिल्ल्लीत महिला आणि व्यापारी सर्वाधिक त्रस्त आहेत. काही दिवसांपूर्वी नागलोई येथे रोशनलाल नावाच्या व्यक्तीने सकाळी दुकान उघडले असता एक मोटरसायकलस्वार आला, गोळीबार करून पळून गेला. काल मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा भाजपच्या लोकांनी मला भेटण्यापासून रोखले. मी थांबलो तर काय होईल? मी अमित शाहांना सांगू इच्छितो की केजरीवाल थांबवू नका, गुन्हेगारी थांबवा. आज तुम्ही तुमचे काम नीट केले असते तर केजरीवालांना थांबवण्याची गरजच पडली नसती आणि मला नागलोईला जाण्याचीही गरज भासली नसती, असे केजरीवाल म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube