भाजपकडून खरंच ऑफर मिळाली का? राजू शेट्टी म्हणाले, मोठी ऑफर आली तरी…
Raju Shetti : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचं वारं वाहू (Lok Sabha Election 2024) लागलं आहे. अशातच सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याचं दिसून येत आहे. राज्यातील अनेक मतदारसंघात भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीकडून चाचपणी सुरु आहे. अशातच पश्चिम महाराष्ट्रातील हातकणंगले या मतदारसंघाकडे भाजपने लक्ष वेधलं आहे. हातकणंगले मतदारसंघासाठी भाजपच्या हायकमांड नेत्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांना फोन केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीत शेट्टींनी महायुतीसोबत यावं यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या घडामोडींवर खुद्द राजू शेट्टी यांनीच खुलासा करत चर्चांना फुलस्टॉप दिला.
भारतीय जनता पक्षाबरोबर आघाडी करण्याच्या संदर्भात माझ्याबरोबर अजून कुणीही संपर्क साधलेला नाही. परंतु, मध्यस्थांमार्फत मी दिल्लीला यावं. अमित शहांना भेटावं. केंद्रीय नेत्यांना भेटावं अशा प्रकारच्या सूचना घेऊन नेते येताहेत. परंतु, मला कितीही मोठी ऑफर दिली तरी मी महायुतीत जाणार नाही, असे राजू शेट्टी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
हातकणंगलेत ठाकरे-पाटील..शेट्टींसाठी ‘आग्रही’ पण त्यांनी तर 2019 चा धसका घेतलाय!
मध्यस्थांकडून मी केंद्रीय मंत्र्यांना भेटावं, त्यांच्याकडून काम करून घ्यावीत, त्यांच्याशी जवळीक साधावी, अशा प्रकारचे निरोप मला येत आहेत. परंतु कितीही मोठी ऑफर आली, तरी हुरळून जाणारा कार्यकर्ता मी नाही. आमच्या कार्यकारिणीने निर्णय घेतलेला आहे. आम्ही ना भाजप सोबत जाणार, ना महाविकास आघाडी सोबत. त्यामुळे आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे. या वक्तव्यानंतर राजू शेट्टी सध्या तरी एकला चलो रे च्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, हातकणंगले मतदारसंघातून सध्या महायुतीचे खासदार धैर्यशील माने विद्यमान आहेत. अद्याप माने यांच्या उमेदवारीबाबत अस्पष्टताच असून या जागेसाठी महाविकास आघाडी आणि भाजपकडून रस्सीखेच सुरु असतानाच आता भाजपच्या हाय कमांड नेत्यांनी डाव साधल्याचं दिसून येत आहे. भाजपच्या केंद्रीय शिष्टमंडळातील नेत्याकडून शेतकरी नेते राजू शेट्टी यांना संपर्क करण्यात आला आहे. एवढंच नाहीतर हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी चर्चा झाली असल्याचं बोललं जात आहे. तसेच भाजपसोबत येण्याबाबतची विनवणीही करण्यात आली आहे. या बातमीमुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
चक्का जाम होणार! पोलिसांना गुंगारा देऊन आंदोलनाला या : ऊसदरासाठी राजू शेट्टी ठाम