Ganpati Visarjan Accident Pune Mumbai : गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या जल्लोषानंतर रविवारी राज्यभरात विसर्जन मिरवणुका मोठ्या उत्साहात निघाल्या. मात्र, पुणे जिल्हा आणि मुंबईत या उत्सवावर दुर्दैवी घटनांची छाया पडली. पुण्यात खेड तालुक्यातील तीन वेगवेगळ्या दुर्घटनांत दोन गणेशभक्तांचा मृत्यू झाला असून दोन जण बेपत्ता आहेत. तर चाकण परिसरात चार जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दुसरीकडे मुंबईतील साकीनाका भागात हाय टेन्शन वायरला ट्रॉली लागल्याने एकाचा मृत्यू झाला तर चारजण गंभीर जखमी झाले.
खेड तालुक्यातील वाकीबुद्रुक गावात (Ganpati Visarjan) विसर्जनाला गेलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. गावकऱ्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरला. याचप्रमाणे बिरदवडी गावातही विसर्जनावेळी एका युवकाचा (Accident) जीव गेला. या दोन अपघातांमुळे गावांमध्ये शोककळा पसरली आहे. तसेच चाकण परिसरातही तीन अपघात घडले. गणेश विसर्जनासाठी गेलेल्या चार जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी माहिती (Ganeshotsav 2025) समोर आली आहे.
मुंबईत शनिवारी मध्यरात्री साकीनाका खैराणी रोड भागात श्री गजानन मित्र मंडळाची विसर्जन मिरवणूक जात असताना भीषण अपघात घडला. रस्त्यावरून जाणाऱ्या टाटा पॉवर कंपनीच्या 11 हजार व्होल्टेजच्या हाय टेन्शन लाईनमधून एक छोटी वायर खाली लटकत होती. ही वायर थेट विसर्जनाच्या ट्रॉलीला स्पर्श होताच पाच जणांना जोरदार विद्युत धक्का बसला.
अपघातात बिनू शिवकुमार (36) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर तुषार गुप्ता (18), धर्मराज गुप्ता (44), आरुष गुप्ता (12), शंभू कामी (20) आणि करण कानोजिया (14) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्यातील विविध भागांत विसर्जनाची धूम असताना या अपघातांमुळे अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे.