Pradnya Satav यांच्यावर हल्ला, संजय राऊत यांचा थेट गृहमंत्र्यांना इशारा
मुंबई : महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेच्या विषयी सध्या अंधाधूंद कारभार चालू आहे. रोज आमदार किंवा लोकप्रतिनिधी सोडाच, पण सामान्य जनता, महिला वर्ग, व्यापारी एका भीतीच्या सावटाखाली राहत आहेत. आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) बाबतीत मराठवाड्यात जो प्रकार घडला, पोलीस कितीही सारवासारव करत असले तरीही घटना घडली आहे. त्याच मराठवाड्यात विधानपरिषदेच्या सदस्या प्रज्ञा सातव या महिला आमदारावर देखील हल्ल्याचा प्रयत्न झाला. असे अनेक गैरप्रकार रोज घडत आहेत. याचं कारण म्हणजे सरकारचं अस्तित्व दिसत नाही. मंत्रीमंडळ काम करत नसल्याची टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावेळी केली.
या सरकारचा नक्की डाव तरी काय आहे. मोठं षडयंत्र रचलं जातंय का ? विरोधी पक्षांच्या आमदारांवर आणि नेत्यांवर भविष्यात जीवघेणे हल्ले व्हावेत आणि त्यातून दहशत निर्माण व्हावी, असा काही कट आहे का ? कारण चित्र तसच दिसत असल्याचा इशारा संजय राऊतांनी यावेळी दिला आहे.
त्यांच्या पक्षात जाणारे काही लोक, त्यांच्या मागेपुढे पोलीस, सुरक्षारक्षकांचा लवाजमा आहे. त्यांना गरज नाही. पण ज्यांना खरंच सुरक्षेची गरज आहे, त्यांच्याविषयी ढिलाईनं काम केलं जात आहे. गृहमंत्र्यांनी वेळीच पावलं उचलली नाहीत, तर त्याचा सगळ्यात मोठा फटका त्यांना बसू शकतो, असा इशाराही संजय राऊतांनी यावेळी दिला.
राज्याचे गृहमंत्री- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपला अगोदरचा कार्यकाळ आठवावा. गेल्या कार्यकाळाची या कार्यकाळाशी तुलना करावी. तेही बहुतेक दिवस ढकलत आहेत. पण त्याचा फटका महाराष्ट्राच्या जनतेला, लोकप्रतिनिधींना बसत आहे. विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधी दहशतीखाली जगत आहेत. कारण सगळ्यांची सुरक्षाव्यवस्था गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काढून घेतली असल्याचे संजय राऊतांनी यावेळी सांगितलं.