Download App

निवडणुकीपूर्वी सौनिक जाणार अन् चहल येणार; ‘लाडक्या’ अधिकाऱ्यासाठी शिंदेंची धडपड?

महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची एसईसी पदावर नियुक्ती करण्याच्या हालचाली विरोधी पक्षाच्या रडारवर आल्या आहेत.

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या मुख्य सचिव पदावर सुजाता सौनिक यांच्याजागी गृह विभागाचे विद्यमान अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल यांना आणण्याच्या जोरदार हालचाली सुरु असल्याची चर्चा आहे. चहल हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘लाडके’ अधिकारी असल्यानेच त्यांना या पदावर आणण्याबाबत वरिष्ठ वर्तुळात चर्चा सुरु असल्याचे बोलले जाते. सौनिक या मे 2025 मध्ये निवृत्त होणार आहेत. मात्र चहल यांना मुख्य सचिव पदावर आणण्यासाठी सौनिक यांना राज्याच्या निवडणूक आयुक्तपदाची ऑफरही देण्यात आल्याची माहिती आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी एक्सवर याबाबत एक पोस्ट लिहित आरोप केले आहेत. यात त्यांनी म्हटले की, मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी सुजाता सौनिक यांच्याशी संपर्क साधून त्यांना निवडणूक आयुक्त पद स्वीकारण्यास राजी केले होते का? याचे स्पष्टीकरण दिले पाहिजे. देशात A1, A2 आणि राज्यात डबल A अशी लाडकी मित्र योजना सुरू आहे. परंतु, प्रशासनात अशी ढवळाढवळ आणि घटनाबाह्य नियंत्रण सहन करण्यायोग्य नाही. नुकतेच ए. राधा यांची बदली कशी झाली हे सर्वांसमोर आहे. आता मुख्य सचिवांवर दबाव येत असेल तर एकूणच प्रशासन संकटात आलेले दिसत आहे. राज्य बिल्डर मित्राला आंदण दिले का? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे असेही सावंत यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगेंनी उपसले आमरण उपोषणाचे हत्यार, 29 सप्टेंबरपासून उपोषणाला बसणार

आयएएस अधिकारी यूपीएस मदान यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर रिक्त होणाऱ्या निवडणूक आयुक्त पदासाठी आयएएस अधिकाऱ्यांत स्पर्धा राहणार आहे. सेवानिवृत्त आयएएस अधिकारी मनोज सौनिक, नितीन करीर, श्रीकांत देशपांडे, राजीव जलोटा, राजगोपाल देवरा आदी काही नावे चर्चेत आहेत. सुजाता सौनिक या पदासाठी इच्छुक नाहीत. या पदासाठी त्यांनी अद्याप अर्जही केलेला नाही. 30 जून रोजी त्यांनी राज्याच्या मुख्य सचिव पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांचा कार्यकाळ 31 मे 2025 पर्यंत असणार आहे. जर त्यांची राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाली तर त्यांना पाच वर्षांचा कार्यकाळ मिळेल.

Jammu Kashmir Election : गणित सुटलं; नॅशनल कॉन्फरन्सला 51, काँग्रेसला 32 जागा, तर 5 जागांवर मैत्रीपूर्ण लढत

इक्बालसिंग चहल हे 1989 च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे IAS अधिकारी आहेत. त्यांना अनेक मोठ्या पदांवर काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी महाराष्ट्र शासन आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. चहल यांना ठाण्याचे जिल्हाधिकारी म्हणून सुमारे चार वर्षे आणि छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी म्हणून चा वर्षे काम करण्याचा अनुभव आहे. ते राज्य उत्पादन शुल्क आयुक्त आणि म्हाडाचे एमडी राहिले आहेत. त्यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणूनही काम केले आहे. याशिवाय मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव म्हणूनही त्यांनी जबाबदारी संभाळली आहे. नुकतीच त्यांची गृहविभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.

follow us