Ajit Pawar Latest Kolhapur Speech : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात विविध ठिकाणी दंगलीच्या (riots) घटना घडतांना पहायला मिळत आहेत. अकोल्यात दंगल झाली. शेवगावमध्ये दंगली झाली. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करत आहेत. अशातच आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यातील धार्मिक ध्रुवीकरणावर भाष्य केलं.
कोल्हापुरातील एका हॉटेलच्या उद्घाटनाप्रसंगी अजित पवार आले असता उपस्थितांसमोर ते बोलत होते. राज्यात जातीय दंगली का होत आहेत, याचा विचार करायला हवा. काही लोकांकडून मुद्दाम, महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न यावरून जनतेचे लक्ष वळविण्यासाठी समाजात तेढ निर्माण केली जाते आहे, असं पवारांनी सांगितलं.
श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण शक्तिपीठ आहे. आता या देवीच्या मंदिरात ‘वेस्टर्न’ कपडे परिधान केलेल्या भाविकांचा ‘प्रवेश’ बंद करण्यात आला आहे. मंदिर समितीच्या या आदेशावरही अजित पवार बोलले. काही देवस्थानांनी कमी कपडे घालून मंदिरात यायचं नाही असं सांगितलं. अनेक ठिकाणी पोशाखच तसा आहे, त्याला काय करणार.
‘बंटीला बंटी म्हणू नका, बंटीला आता बंटी झाले’; अजितदादांनी घेतली सतेज पाटलांची फिरकी
आम्ही शाळेत असताना दहावीपर्यंत हाफ पँट घालायचो. तेव्हा घरातील लोक म्हणायचे की तू अकरावीला गेलास तर फुल पँट देतो. ग्रामीण भागात हा प्रकार होता. भारतीय संस्कृतीप्रमाणेच अनेक वेगवेगळ्या धर्मात, पंथात वेगवेगळा पेहराव आहे. काही ठिकाणी लुंगी पायजमा घालण्याची प्रथा आहे तर अलीकडे जीन्स पँट मोठ्या प्रमाणात परिधान केली जाते. योग्य कपडे घालावे दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, हाफ पॅन्ट घालू नका, असं कोणत्या देवानं सांगितलं.
कुणी गोमूत्र शिपडतंय कोणी काय करताय. कोणत्या मार्गाने तुम्ही महाराष्ट्राला घेऊन जाताय?, असा सवाल त्यांनी केला.
दरम्यान, यावेळी बोलतांना त्यांनी शिंदे-फडववीस सरकारवही टीका केली. अजित पवार म्हणाले, महाविकास आघाडीचं सरकार असतांना आम्ही राज्याला पुढं नेण्याचं काम केलं. मात्र, आता विकासकामांना आडकाठी घातली जाते सरकारे येतात, सरकारे जातात, पण सत्तेचा उन्माद करू नका. विकासकामे रोखू नका, विरोधकांची कामे करा, अन्यथा जनता दाखवून देईल. कर्नाटकात काय झाले ते पाहिलं ना, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.