विधानसभेपूर्वी बडा धमाका होणार, खैरेंसह 10 जण इच्छुक; भागवत कराडांचा मोठा दावा
Bhagwat Karad : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भाजपचे बडे नेते आणि माजी उपमहापौर राजू शिंदेंनी काल ठाकरे गटात प्रवेश केला. शिवसंकल्प मेळाव्यात राजू शिंदेंनी (Raju Shinde) उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) उपस्थितीत हातावर शिवबंधन बांधले. राजू शिंदे ठाकरे गटात गेल्यानं भाजपला मोठं खिंडार पडलं. दरम्यान, या पक्षप्रवेशावर आता माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी भाष्य केलं.
आमच्या पक्षाला खिंडार वगैरे काही पडलेलं नाही. उलट आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्याकडचे काही मोठे नेते आमच्याकडे येतील, असा दावा कराड यांनी केला.
शिंदेंनी पक्ष सोडल्याने फरक पडणार नाही…
कराड यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, 20 वर्षांपूर्वी कमळाच्या चिन्हावर निवडून आलेले एकमेव नगरसेवक म्हणजे राजू शिंदे आहेत. त्यांच्यासोबत असलेले दोन नगरसेवक वगळता कोणीही भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली नाही. त्यामुळे आमच्या पक्षाला खिंडार वगैरे पडल्याचा भाग नाही. हे लोक गेल्यामुळं भाजपला काही फरक पडणार नाही, असं कराड म्हणाले.
…म्हणून राजू शिंदे ठाकरेंसोबत गेले
पुढं बोलतांना ते म्हणाले, राजू शिंदेंना आगामी विधानसभा निवडणूक लढवायची आहे. त्यांना संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं आहे. त्यांना ठाकरे गटाकडून आश्वासन मिळालं असल्यामुळे ते तिकडे गेले. त्यांनी पक्ष सोडण्यास इतर कुठलंही कारण नाही, असं कराड म्हणाले.
IAF Agniveervayu : भारतीय हवाईदलात अग्निवीर वायु पदासाठी भरती सुरू, कधीपर्यंत करता येणार अर्ज?
विधानसभेपूर्वी मविआचे नेते भाजपमध्ये येणार
विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून खैरेंसह इतर दहा जण विधानसेभेची तयार करत आहेत. ते विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळं त्यांच्या पक्षात अंतर्गत स्पर्धा आहे. मलाही त्यांच्याकडील चार जणांचे फोन येऊन गेले. विधानसभा निडणुकीच्या आधी आमच्याकडे देखील त्यांच्याकडचे (महाविकास आघाडी)चे बडे नेते येणार असून तुम्हाला आगामी काळात मोठे धमाके पाहायला मिळणार, असं कराड म्हणाले.
शिंदेंच्या प्रवेशाने खैरे नाराज
छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत खैर यांना उमेदवारी द्यावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. अशातच राजू शिंदेंनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे खैरेंचा पत्ता कट झाल्याची चर्चा आहे. याबाबत खैरेंना विचारले असता ते म्हणाले, विधानसभा निवडणूक लढवण्यास मी सध्या इच्छुक नाही. मात्र उद्धव ठाकरे यांनी आदेश दिला तर मी नक्कीच निवडणूक लढवेन. मात्र, कोणाला उमेदवारी द्यायची हे उद्धव ठाकरेंच्या हातात आहे. ते योग्य तो निर्णय घेतील, असं खैरे म्हणाले.