Sanjay Raut : मोदी सरकारने राष्ट्रपतींची अवस्था रबरी स्टॅम्पसारखी केली; संसदेच्या उद्घाटनाला विरोधकांचा बहिष्कार
Sanjay Raut Said Modi made the President like a rubber stamp, the opposition boycotted the inauguration of the new Parliament building : नवीन संसद भवनाच्या (New Parliament House) उद्घाटनाची तारीख निश्चित करण्यात आली असून, 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. मात्र, नवीन संसद भवनाच्या उद्घाटन राष्ट्रपतींना डावलून मोदींच्या हस्ते होत असल्यानं विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका होतेय. अशातच आता ठाकरे गटाचे नेते – खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केलं. राष्ट्रपतींना (President) डावलल्याने विरोधकांचा उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार असल्याचं राऊतांनी सांगितलं.
राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत नवीन संसद भवनाच्या उद्घटनावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. देशात संसदेच्या नव्या इमारतीची गरज होती का? असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना केवळ आपल्या आपल्या नावाची पाटी संसद भवनावर लावायची. त्यामुळं त्यांनी नव्या संसद भवनाची उभारणी केली, असा आरोप त्यांनी केला.
पुढे ते म्हणाले, ‘एका राष्ट्रपती असलेल्या आदिवासी महिलेला संसद भवनाचं उद्घाटन करण्यासाठी सरकारनं डावललं, त्यामुळं आम्ही सर्व विरोधी पक्षांनी संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकला आहे. काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष या सोहळ्यावर बहिष्कार टाकणार आहेत, असं ते म्हणाले.
माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, संसदेची सध्याची इमारत क्रांतिकारी आणि ऐतिहासिक आहे. या इमारतीत पहिले सरकार स्थापन झाले. अनेक क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या उपस्थितीने ही वास्तू पावन झाली आहे. या वास्तूत अनेक ऐतिहासिक घटना घडल्या. ही इमारत आणखी 100 वर्षे टिकली असती. पण त्याहीपेक्षा जगभरात संसदेच्या अनेक जुन्या इमारती आहेत. आमची इमारत या इमारतींपेक्षा नवीन होती. मात्र, सरकारने तरीही संसदेची नवीन इमारत बांधली.’
Pune : काँग्रेस पदाधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; पुण्यात खळबळ
देशाच्या राष्ट्रपतींना डावलण्याचे प्रयत्न होत आहेत. राष्ट्रपती हे देशाच्या संविधानाचा प्रमुख असतात. राष्ट्रपतींनी संसद भवनाचे उद्घाटन करणे हा प्रोटोकॉल आहे. मात्र, पंतप्रधानांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करून ते राजकीय इव्हेट करत आहेत, मोदींनी राष्ट्रपतींची अवस्था रबरी स्टॅम्पसारखी केली, अशी टीका राऊतांनी केली.
तसेच, ‘आम्ही आदिवासी महिलेला राष्ट्रपती केले, असे चित्र त्यांनी जगासमोर मांडलं आहे. संसदेच्या उद्घाटन समारंभाला राष्ट्रपतींना का बोलावण्यात आले नाही, याचे उत्तर मोदी सरकारने द्यावे. तसेच देशाच्या राष्ट्रपतींना डावल्याचं कारण तरी काय आहे? याचा खुलासाही त्यांनी करावा. आदिवासी महिलेला राष्ट्रपती बनवले असं सांगणाऱ्या मोदींना नव्या संसद भवनाचे उद्घाटन करताना त्यांची आठवण का झाली नाही,’ असा सवालही राऊतांनी केला.
राऊत यांच्या आधी कॉंग्रेसनेही नवी संसद भवनाच्या उद्घाटनावरून सरकारवर टीका केली होती. पंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन चुकीचे आहे. त्यामुळं नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींनी करावे, पंतप्रधानांनी नव्हे, असे राहुल गांधी म्हणाले होते.