ग्रामीण राजकारणाचा हुकूमी एक्का! उत्तर पुणे जिल्हाध्यक्षपदी प्रदीप कंद; भाजपनं दिली मोठी जबाबदारी

Pune News : आगमी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Pune News) निवडणुका पाहता भारतीय जनता पार्टीने मोठा निर्णय घेतला आहे. संघटन अधिक मजबूत करण्यावर भर दिला आहे. यातच आज राज्यातील जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यात पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांना (Pradeep Kand) भाजपने उत्तर पुणे जिल्हाध्यक्ष (मावळ) पदाची जबाबदारी दिली आहे. या पदावर आधी शरद बुट्टे पाटील कार्यरत होते. त्यांच्या जागी आता पक्षाने प्रदीप कंद यांना संधी दिली आहे.
भाजपाचे प्रदेश निवडणूक अधिकारी चेनसुख संचेती यांनी आज राज्यातील 58 जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. यात पुणे जिल्ह्यातील तीन जिल्हाध्यक्षांचा समावेश आहे. पुणे शहर जिल्हाध्यक्षपदी धीरज घाटे तर पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्षपदी शत्रुघ्न काटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण राजकारणाची उत्तम जाण असलेल्या प्रदीप कंद यांना उत्तर जिल्हाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली आहे.
जगतापांना भिडणारे शत्रुघ्न काटे पिंपरी-चिंचवडचे नवे शहराध्यक्ष; मनपा निवडणुकीत चमत्कार करणार?
नवनियुक्त उत्तर जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांची ग्रामीण राजकारणावर चांगली पकड आहे. 2012 मध्ये कंद राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर जिल्हा परिषदेत निवडून आले होते. यानंतर अजित पवार यांनी त्यांची सभागृह नेतेपदी निवड केली होती. मात्र त्यांनी हे पद नाकारलं होतं. यानंतर अजित पवारांनी त्यांना थेट जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी नियुक्त केले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून प्रदीप कंद यांनी उल्लेखनीय काम केलं.
जिल्ह्यातील शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या या कामामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता सुधारली. तसेच पटसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढली होती. उपाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपताच त्यांना सन 2014 मध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. 20 मार्च 2017 पर्यंत त्यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिले. अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर साधारण दीड वर्षांनंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपचा झेंडा हाती घेतला होता.
यानंतर आता भाजपने त्यांची उत्तर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. प्रदीप कंद यांची नियुक्ती अशा वेळी झाली आहे की लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रदीप कंद यांना ग्रामीण राजकारणाची चांगली जाण आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्यांचे संघटन कौशल्य उत्तम आहे. अशा परिस्थितीत कंद आता जिल्हाध्यक्षपदाला कसा न्याय देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
पुणे भाजपचे पुन्हा धीरज घाटेच कारभारी.. बिडकर, भिमालेंच्या पदरी निराशा…