सुरू होण्याआधीच पॅकअप! क्रिकेटच्या इतिहासात ‘या’ आठ सामन्यात फक्त पावसाचाच खेळ
Test Matches Abandoned Without a ball Bowled : क्रिकेट सामन्यात एकही चेंडू न टाकता सामना रद्द झाला असं तुम्ही ऐकलं आहे का.. कदाचित ऐकलं नसेलं. पण इतिहासात डोकावलं तर असे काही सामने आहेत ज्यामध्ये एकही चेंडू टाकला गेला नाही. हे सामने रद्द होण्यामागचं कारण पावसाचच होतं. पावसामुळे सामने रद्द करावे लागले होते. आता इतिहासातल्या या गोष्टींची आताच चर्चा करण्याचं कारणही आहे. उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडात अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी सामना होणार होता. मात्र पावसामुळे हा सामना रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.
एकही चेंडू न टाकता हा सामना रद्द झाल्याने या सामन्याची इतिहासात नोंद झाली आहे. इतिहासातील हा आठवा कसोटी सामना ठरला आहे. यानिमित्ताने इतिहासातील अशाच रद्द झालेल्या सात कसोटी सामन्यांची अगदी थोडक्यात माहिती घेऊ या…
सन 1890 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUS vs ENG) यांच्यातील कसोटी सामना रद्द करावा लागला होता. हा सामना ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर होणार होता. मात्र पावसाने उघडीप दिलीच नाही. त्यामुळे एकही चेंडू न टाकताच हा सामना रद्द करावा लागला होता. दोन्ही देशांच्या मालिकेतील हा तिसरा सामना होता.
सन 1938 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात मँचेस्टर येथे मालिकेतील तिसरा सामना होणार होता. पण हा सामनाही पावसाने वाहून नेला. या सामन्यात एकही चेंडू टाकता आला नव्हता.
1970-71 च्या अॅशेज सिरीजदरम्यान एक सामना अशाच पद्धतीने रद्द करावा लागला होता. या मालिकेतील तिसरा सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दरम्यान मेलबर्न येथे होणार होता. परंतु, मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) पाच दिवस खेळ होऊ शकला नाही. पावसाव्यतिरिक्त अन्य कारणांमुळे सामना रद्द करावा लागला.
BCCI ला ट्रोल करणाऱ्यांना जशास तसं उत्तर; अफगाणिस्तान बोर्डाने केला मोठा खुलासा
पाकिस्तानच्या संघाने 1989 मध्ये न्यूझीलंडचा दौरा केला होता. दोन्ही संघांच्या मालिकेतील (Pakistan Cricket) पहिला कसोटी सामना 3 फेब्रुवारीपासून डुनेडिन येथे होणार होता. परंतु, येथेही पाऊस खलनायक ठरला. सुरुवातीच्या तिन्ही दिवस फक्त पावसाचीच बॅटिंग सुरू होती. त्यामुळे पाऊस उघडण्याची आणखी वाट न पाहता सामना रद्दची घोषणा करण्यात आला. या सामन्यात नाणेफेक सुद्धा झाली नव्हती.
वेस्टइंडिज आणि इंग्लंड दरम्यान मार्च 1990 मध्ये सिरीज खेळवण्यात आली होती. या सिरीजमधील दुसरा सामना गुयानातील जॉर्जटाउन मध्ये होणार होता. येथेही पावसाचा व्यत्यय आला. सामना रद्द करावा लागला.
सन 1998 मध्ये झिम्बाब्वेचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर (ZIM vs PAK) आला होता. त्यावेळी सिरीजमधील तिसरा सामना 17 डिसेंबरपासून फैसलाबाद येथे सुरू होणार होता. मात्र पाच दिवस पाऊस इतका मुसळधार बरसला की एकही चेंडू न टाकता सामना रद्द करावा लागला.
सन 1998 मध्येच टीम इंडिया (Team India) न्यूझीलंडच्या दौऱ्यावर होती. या मालिकेची सुरुवात 18 डिसेंबरपासून डुनेडिन टेस्टपासून होणार होती. पण पावसाने सारा खेळच पालटून टाकला. सुरुवातीचे तीन दिवस पाऊस थांबला नाही. त्यामुळे सामना सुरू करता आला नाही. यानंतर पावसाचा अंदाज घेत नाणेफेक न करताच सामना रद्द करण्यात आला. कसोटी क्रिकेटमध्ये हा अखेरचा सामना होता जो एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला.
Jay Shah : गुजरात क्रिकेट ते ICC चा तरुण अध्यक्ष; जय शाहांची मैदानाबाहेरची खास स्टोरी..