Maharashtra Elections 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू (Maharashtra Elections 2024) आहे. अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर निवडणुकीचं खरं चित्र स्पष्ट झालं आहे. उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. स्टार प्रचारकांच्या सभा सुरू झाल्या आहेत. भूम परांडा वाशी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. तानाजी सावंत यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मैदानात उतरले आहेत. सावंत यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची जाहीर सभा होणार आहे. उद्या शुक्रवारी (८ नोव्हेंबर) सकाळी ११.३० वाजता परांडा येथील कोटला मैदानात सभा आयोजित करण्यात आली आहे.
फक्त फोन उचलून विकास होत नाही तर..,; तानाजी सावंतांचा ओमराजेंवर निशाणा
शिवसेनेत बंड झालं त्यावेळी तानाजी सावंत यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. भाजप बरोबरील सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडे आरोग्य खात्याची जबाबदारी दिली. आता शिंदेंनी विश्वास दाखवत पुन्हा सावंत यांनाच तिकीट दिलं आहे. तानाजी सावंत यांच्या विरोधात शरद पवार गटाने राहुल मोटे यांना उमेदवारी दिली आहे. आता या दोघांत येथे थेट लढत होणार आहे.
तानाजी सावंत यांच्या प्रचाराची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. यासाठी परांड्यात त्यांची जाहीर सभा होणार आहे. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. आता या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलतात, कुणाला रडावर घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
तानाजी सावंत धाराशिव जिल्ह्यातील भूम परांडा वाशी मतदारसंघाचे आमदार आहेत. यंदा शिंदे गटाने त्यांना उमेदवारी दिली आहे. सावंत यांचा जन्म १ जून १९६४ रोजी माढा तालुक्यातील (जि. सोलापूर) वाकाव येथे झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या तानाजी सावंत यांनी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरींगमधून पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी पीएचडी देखील पूर्ण केली. प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं.
तानाजी सावंत आव्हान पेलणार! भूम-परांडा खेचून आणणार?
दरम्यान, परंडा विधानसभा मतदारसंघ भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा मतदारसंघ. परंडा-भूम-वाशी या तीन तालुक्यांत तब्बल 247 गावांमध्ये हा मतदारसंघ पसरला आहे. दुष्काळी भाग असला तरी ऊस आणि साखर हे या मतदारसंघातील राजकारणाचे अस्त्र.
याच अस्त्राच्या जोरावर ज्येष्ठ नेते शरद पवार, पद्मसिंह पाटील यांनी आपला प्रभाव तयार केला होता. या प्रभावातून त्यांनी महारुद्र मोटे यांचे नेतृत्व उभे केले आणि घडवले. ते 1985 आणि 1990 असे सलग दोनवेळा ते आमदार झाले. 1995 मध्ये महारुद्र मोटे यांचा काही मतांनी पराभव झाला. सन 1995 मध्ये ज्ञानेश्वर पाटील यांनी पहिल्यांदा शिवसेनेचा भगवा या मतदारसंघावर फडकवला होता.