बार्शीत फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट

बार्शीत फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट

सोलापूर : आज नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीच राज्यात नाशिकमधील इगतपुरी आणि सोलापुरातील बार्शीमध्ये भीषण घटना घडल्या आहेत. इगतपुरीतील जिंदाल कंपनीला मोठी आग लागली होती. या आगीमध्ये काही कामगार जखमी झाल्याची माहिती समोर आली होती.

बार्शी तालुक्यातील पांगरीमध्ये फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट झाला आहे. यात अनेक कामगार जखमी झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असताना भीषण स्फोट झाला.स्थानिकांच्या माहितीनुसार या घटनेमध्ये दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय. मात्र प्रशासनाने याला अद्याप कोणताही दुजोरा दिलेला नाही. या घटनेतील मृतांचा आकडा मोठा असल्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

फटाका फॅक्टरीमध्ये जवळपास 40 कर्मचारी काम करत होते अशी प्राथमिक माहिती आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार 6 ते 7 कर्मचारी जखमी झाल्याची आणि दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

अग्निशमन दल, पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. ही घटना पांगरी शिराळा रस्त्यावर असलेल्या एका फटाक्याच्या कारखान्यात घडली. घटनेनंतर मोठा आवाज परिसरात झाला. तसेच धुराचे आणि आगीचे लोट परिसरात दिसून येत होते.

बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळ रविवारी दुपारी चारच्या सुमारास भीषण घटना घडली. ही फटाक्याची फॅक्टरी गेल्या दहा वर्षांपासून सुरु आहे. या फॅक्टरीत आजूबाजूच्या गावातील कामगार कामासाठी येत होते.

आज चार वाजेच्या सुमारास फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असताना झाला भीषण स्फोट झाला. यात काही कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे तर गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत. अद्याप मृतांचा आकडा किती आहे हे स्पष्ट झालेलं नाही.

जखमींना तातडीने पांगरी येथील ग्रामीण रुग्णालय तसेच बार्शीतील दवाखान्यांमध्ये उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि प्रशासन, तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले आहेत.

नववर्षाच्या पहिल्या दिवशी भीषण घटना घडल्याने बार्शी तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube