लोकसभेला दोन पावले मागे आलो पण विधानसभेला..,; शरद पवारांच्या विधानाने खळबळ
Sharad Pawar News : लोकसभा निवडणुकीला (Loksabha Election) महाविकास आघाडी टिकण्यासाठी मी दोन पावले मागे आलो, असल्याचं मोठं विधान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलंय. नुकतीच राज्यात लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याबाबतचेही निर्देश शरद पवार यांनी दिले आहेत. ते पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात आयोजित बैठकीत बोलत होते.
आरक्षणाचं शून्य ज्ञान अन् त्यावर बोलण्याची लायकीही नाही; हाकेंनी जरांगेंची लायकीच काढली
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आम्हाला जास्त जागा मिळायला हव्या होत्या, पण महाविकास आघाडी टिकून राहण्यासाठी मी दोन पावले मागे आलो आहे. आता विधानसभा निवडणुकीसाठी सर्वांनी कामाला लागावे, आपल्याला राज्यातील सत्ता ताब्यात घ्यायची असून त्यासाठी लोकांची जास्तीत जास्त कामे करा, त्यांचे प्रश्न सोडवा, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलंय.
लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने 10 लोकसभेच्या जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 8 जागांवर विजय मिळवला. एकूण लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचा स्ट्राईक रेट 80 टक्के असल्याचं दिसून आलं. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमधील घटक पक्ष राष्ट्रवादी जास्तीत जास्त जागांची मागणी करण्याची आग्रही भूमिका घेणार असल्याचं अप्रत्यक्ष विधान शरद पवार यांनी केलंय.
एकाच वर्षात स्वीस बँकांमधील भारतीयांची ‘माया’ कमालीची घटली : निवडणुकीसाठी खर्च झाला पैसा?
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष ठाकरे गटाने 21 जागा लढवल्या होत्या. 21 जागांपैकी 9 जागांवर ठाकरे गटाने विजय मिळवला, तर दुसरीकडे काँग्रेसने 17 जागा लढवल्या होत्या. या 17 जागांमध्ये काँग्रेसच्या 13 उमेदवारांना घवघवीत यश मिळाल्याचं दिसून आलं. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने अवघ्या 10 जागा लढवत 8 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे पवारांचं आजचं विधान पाहता पुढील काळात शरद पवार गट विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये सर्वाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी आक्रमक पवित्रा घेणार असल्याचे संकेतच दिले आहेत.
दरम्यान, पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीचे आयोजित करण्यात आले होते. या बैठकीला शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार, बाळासाहेब पाटील, यांच्यासह पक्षाचे सर्व नवनिर्वाचीत आठ खासदार उपस्थित होते.