Stampede at Goa Temple : गोव्यात लैराई देवी यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी झाली. (Temple) या अपघातात किमान ७ जणांचा मृत्यू झाला तर ३० जण जखमी झाले आहेत. जखमींना गोव्यातील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं आहे.
लैराई देवीचे मंदिर गोव्यात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. दक्षिण गोव्यातील शिरोडा गावात हे मंदिर आहे. या मंदिरात दरवर्षी यात्रा असते. त्यामध्ये 40 ते 50 हजार भाविक सहभागी होतात. शनिवारी या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक पोहचले. सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार, एका ठिकाणी उतार असताना गर्दीतील लोक वेगाने चालू लागली. त्यामुळे गर्दीत गोंधळ निर्माण झाला. पळापळ सुरु झाली. त्यामुळे चेंगराचेंगरी सुरु झाली.
अग्नीवर चालण्याची परंपरा
दक्षिण गोव्यातील शिरोडा गावात लैराई देवीची विशेषतः पूजा केली जाते. हे स्थानिक लोकांसाठी आणि जवळच्या भागातील भाविकांसाठी एक महत्त्वाचं आध्यात्मिक केंद्र आहे. या ठिकाणी मंदिरामुळं दारू आणि अंडी देखील निषिद्ध आहेत. गावात कोणत्याही प्राण्याची हत्या करत येत नाही. या गावात घोडेही येऊ शकत नाहीत. लैराई देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने लोक येतात.
लैराई देवी यात्रा गोव्यातील एक प्रमुख धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे. ही यात्रा हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र महिन्यात (मार्च-एप्रिल) होते. अनेक दिवस ही यात्रा चालते. या उत्सवातील सर्वात प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे अग्नीवर चालण्याची परंपरा आहे. ज्यामध्ये ‘धोंड’म्हटले जाणारे भक्त जळत्या अंगारांवर अनवाणी चालतात. हा विधी त्यांच्या श्रद्धेचे आणि आध्यात्मिक शुद्धतेचे प्रतीक आहे.
घटनेची माहिती मिळताच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रुग्णालयात पोहचले. उत्तर गोवा जिल्हा रुग्णालय आणि बिचोलिम रुग्णालयात जाऊन त्यांनी जखमींची भेट घेतली. त्यांच्या उपचारांबाबत निर्देश दिले. अधिकाऱ्यांना जखमींना सर्व वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले.