पवारांपाठोपाठ उद्धव ठाकरेही मैदानात; थेट कार्यकर्ते अन् पदाधिकाऱ्यांच्या दारावर जाऊन साधणार संवाद
Uddhav Thackeray : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यानंतर आज मुंबईत शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार गटाच्या बैठका झाल्या. दोन्ही गटातील नेत्यांनी एकमेकांवर जोरदार आरोप केले. शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी पुन्हा संघर्ष करत राष्ट्रवादी काँग्रेस उभी करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यानंतर आता महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेनेचे (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरेही (Uddhav Thackeray) मैदानात उतरले आहेत.
आज उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी पक्षाच्या माजी आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत आपापल्या विभागात जाऊन विभागातील नागरिकांचे प्रश्न सोडवावे व विभागात कामे करावी, अशा सूचना त्यांनी या माजी आमदारांना दिल्या.
दोन्ही गटांचा राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा; ठोठावलं निवडणूक आयोगाचं दार
येत्या 8 जुलैुपासून उद्धव ठाकरे स्वतः राज्यभर दौरा सुरू करणारआहेत. या दौऱ्यात कुठलीही जाहीर सभा होणार नसून कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी उद्धव ठाकरे संवाद साधणार असल्याचे सांगण्यात आले. सध्या राज्यात ज्या घडामोडी सुरू आहेत त्याअनुषंगाने त्यांच्या या दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे.
या दौऱ्यात ठाकरे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांशीही संवाद साधतील. पक्ष बांधणीसाठी तसेच निवडणुका जवळ आल्याने या माध्यमातून वेगळी रणनिती तयार करण्यात येत असल्याचे यावरून दिसून येत आहे.
अजित पवारांना मोठा धक्का; उजवा हात समजल्या जाणाऱ्या अशोक पवारांनी सोडली साथ
काँग्रेसलाही हादरे..
दरम्यान, राज्यातील या भूकंपानंतर काँग्रेसही सतर्क झाली आहे. निर्णय घेण्यात काँग्रेसकडून नेहमीच वेळकाढूपणा केला जातो असे म्हटले जाते. अनेक प्रसंगात ते दिसूनही आले आहे. मात्र, अजितदादांच्या बंडानंतर काँग्रेस नेत्यांनी तत्काळ निर्णय घेतले. राष्ट्रीय महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर आघाडी करण्याच्या दृष्टीने चर्चा केली.
शरद पवार मैदानात, पहिली सभा भुजबळांच्या बालेकिल्ल्यात
राष्ट्रवादीतील या फाटाफुटीनंतर पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी खुद्द शरद पवार मैदानात उतरले आहेत. त्यांनीही राज्याभरात झंझावाती दौरे सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे. पवारांची पहिलीच सभा अजित पवार गटातील आमदार छगन भुजबळ यांच्या येवला (जि. नाशिक) मतदारसंघात होणार आहे. त्यानंतर धुळे आणि जळगाव येथेही त्यांच्या सभा होणार आहेत. त्यांचा हा दौरा 8 जुलैपासूनच सुरू होणार आहे.